*तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर* *जुलै महिन्यात 2 लाख 16 हजाराहून अधिक कोव्हीड टेस्टींग*

अनेक देशांतील कोव्हीड परिस्थिती लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविल्यानुसार कोव्हीडची तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन ती जास्तीत जास्त लांबविण्याकरिता प्रभावी उपाययोजना राबविण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर दिला जात आहे. कोव्हीडची तिसरी लाट जितकी उशीरा येईल तितका अधिक कालावधी नागरिकांना कोव्हीड लसीव्दारे संरक्षित करण्यासाठी मिळेल तसेच आरोग्य सुविधांमध्ये केल्या जात असलेल्या वाढीसाठीही मिळेल हे लक्षात घेऊन मिशन ब्रेक द चेन अंतर्गत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे.
कोव्हीडचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी दररोज संध्याकाळी 7 नंतर आयुक्त वेबसंवादाव्दारे चर्चा करीत असून त्या दिवसात आढळलेले रूग्ण, त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती व टेस्टींग, दिवसभरात झालेले लसीकरण, दुस-या दिवसाच्या लसीकरणाचे नियोजन, मृत्यू याबाबत सविस्तर विचारविनीमय केला जात आहे.
*दैनंदिन वेबसंवादामधील चर्चेतील निरीक्षणानुसार आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ज्या ठिकाणी कोव्हीड रूग्ण आढळतो त्या इमारतीमधील सर्व नागरिकांच्या टेस्टींगला महानगरपालिकेने महिन्याभरापासून सुरूवात केलेली आहे. या टेस्टींगमुळे एरव्ही जे रूग्ण कोव्हीडची कोणतीही दृश्य लक्षणे दिसत नसल्यामुळे समाजात मिसळत राहिले असते व कोव्हीडचे वाहक झाले असते, ते रूग्ण वेळीच आढळून आल्याने त्यांचे विलगीकरण होऊन त्यांच्यापासून होणारा कोव्हीडचा प्रसार तिथेच रोखला जात आहे. यामुळे आज काही प्रमाणात कोव्हीड रूग्णांची संख्या वाढलेली दिसत असली तरी ते पुढील प्रसार रोखण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.*
*याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी टेस्टींगमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आलेली असून एका जुलै महिन्यातच तब्बल 2 लाख 16 हजार 411 नागरिकांचे टेस्टींग करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 1 लक्ष 63 हजार 504 नागरिकांचे अँटिजेन तसेच 52 हजार 907 नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी 7 हजार नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्या इमारतीत पॉझिटिव्ह रूग्ण आढळतो त्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे तसेच बैठ्या घरांतील आसपासच्या नागरिकांचे टारगेटेड टेस्टींग करण्यात येत असून त्यासोबतच सर्व रेल्वे स्टेशन्स, एपीएमसी मार्केटची प्रवेशव्दारे, बाजार व वर्दळीच्या जागा याठिकाणीही टेस्टींगवर भर देण्यात आलेला आहे. *दैनंदिन कोव्हीड रूग्णांची संख्या जरी कमी झाली तरी टेस्टींगची संख्या कमी न करता उलट ती वाढवून कोव्हीड प्रसाराला वेळीच खंड़ीत करण्याचे महानगरपालिकेचे धोरण निश्चितच प्रभावी आहे. अशी नियोजनबध्द पावले उचलल्यामुळे व त्याला नवी मुंबईकर नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत असल्यामुळे नवी मुंबईतील कोरोना वाढीचा दर कमी करण्यात यश मिळताना दिसत आहे.*
*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या साधारणत: 15 लक्ष लोकसंख्येच्या तुलनेत 13 लक्ष 93 हजाराहून अधिक नागरिकांचे टेस्टींग करणारी नवी मुंबई ही लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक कोव्हीड टेस्टींग करणारी महानगरपालिका आहे.*
*टारगेटेड टेस्टींग हे कोरोना विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या इमारतीत अथवा वसाहतीत कोव्हीड रूग्ण आढळल्यास संबंधित महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केल्या जाणा-या टारगेटेड टेस्टींगला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 02-08-2021 15:54:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update