*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मातृ वंदना सप्ताहाला सुरुवात*
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदन योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. 1 सप्टेंबर पासून 7 सप्टेंबर या कालावधीत या योजनेची माहिती व्यापक स्वरूपात प्रसारित करण्यासाठी तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी 'मातृ वंदना सप्ताह' राबविला जात आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी PMMVY-CAS पोर्टलवर करणे तसेच एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार मातृ वंदना सप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येत असून सप्ताह कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत यापूर्वीच सर्व नागरी आरोग्य केंद्रांमार्फत एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मातृ वंदना सप्ताहाचा प्रारंभ सर्व विभागांमध्ये गर्भवती मातांना पोषक आहारासंबंधीत मार्गदर्शन करून तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची माहिती देऊन करण्यात आला.
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत 1 जानेवारी 2017 पासून निकषानुसार पात्र लाभार्थ्यांकरिता प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित केलेली आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला रु. 5 हजार इतकी रक्कम रु. 1 हजार, रु.2 हजार व रु. 2 हजार अशी तीन टप्प्यात देण्यात येणार असून सदर रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी हा योजनेचा मुख्य उद्देश असून याव्दारे जन्माला येणा-या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा हे ध्येय नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने 21 हजार 227 अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 18 हजार 457 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला असून 86.95 टक्के इतके उद्दीष्ट साध्य केले आहे. महानगरपालिकेच्या सर्व 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच माता बाल रुग्णालय व सार्वजनिक रुग्णालय यांचे वैद्यकीय अधिक्षक यांची विशेष बैठक आयोजित करून कोणतीही लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याकरिता दक्षतेने लाभार्थ्याचा शोध घेण्यात यावा तसेच त्याची पोर्टलवर नोंदणी कऱण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे आणि खाजगी मॅटर्निटी होम, स्त्री रोग तज्ज्ञांची रुग्णालये याठिकाणी 400 हून अधिक बॅनर्सव्दारे या योजनेची व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये या योजनेची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची काटेकोर काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत देण्यात आले असून त्यानुसार आरोग्य विभागामार्फत 'मातृ वंदना सप्ताह' उत्साहाने राबविण्यात येत आहे.
Published on : 02-09-2021 11:46:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update