कोरोना प्रभावित कालावधीत लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात हवेतील प्रदूषण कमी होऊन आकाश निरभ्र व निळसर दिसू लागले. त्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस सन 2020 पासून 'इंटरनॅशनल क्लिन एअर डे फॉर ब्ल्यू स्काय' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झालेली आहे.
त्या अनुषंगाने यावर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रमाचे आयोजन करीत 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन' महापालिका मुख्यालयात पर्यावरणविषयक कार्यशाळेचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी 'निरी' या नामांकीत संस्थेचे प्रधान वैज्ञानिक डॉ. नितीन गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना हवा प्रदूषण करणारे स्त्रोत, हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम व हवा प्रदूषण कमी करण्याकरिता करावयाच्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रादेशिक वाहन विभागाच्या वाहन निरीक्षक श्रीम. रश्मी पगार यांनी वाहनाव्दारे होणारे प्रदूषण कमी करण्याकरीता परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांविषयी माहिती दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. जयंत कदम यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा प्रदूषण कमी करण्याकरीता प्रदूषण करणा-या स्त्रोतांची अचूक व तत्पर माहिती मिळण्याकरीता मंडळामार्फत सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्रांची (CAAQMS) उभारणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे यांनी घनकचरा व्यवस्थापनाविषयी तसेच बांधकाम व पाडकाम कचरा याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या उपाययोजना व प्रकल्प याविषयी माहिती देत अधिक उत्तम पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या विशेष कार्यशाळेप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड, निरी संस्थेच्या वैज्ञानिक श्रीम. आरती सोनी, ठाणे बेलापूर औद्योगिक असो. चे श्री.मंगेश ब्रम्हे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.