*नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या सुरक्षेचे सक्षमीकरण*

नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत ही देशातील वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना मानली असून याठिकाणी विविध कामांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचप्रमाणे आंदोलने, मोर्चे याप्रसंगी नागरिक / संस्था यांची शिष्टमंडळे येत असतात. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कामकाजात व्यत्यय येऊ नये या दृष्टीने महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी अशा सूचना विविध माध्यमांतून प्राप्त होत होत्या. याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयामार्फतही नवी मुंबई महानगरपालिका ही मुख्य प्रशासकीय इमारत असल्याने येथील सुरक्षेबाबत अधिक सक्षम उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात येत होते. त्याचप्रमाणे नमुंमपा मुख्यालयाचे ठिकाण हे खाडीकिनारी असून अतिरेकी हल्ला अथवा समाजकंटकांकडून होणारे हल्ले यादृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने येथील सुरक्षा व्यवस्था चोख असणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय सद्यस्थितीत कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना कोरोना सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तथापि नमुंमपा मुख्यालयात अभ्यागतांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे कोरोना प्रसाराचा धोका संभवतो. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून सध्या कोव्हीड-19 सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने मुख्यालय इमारतीची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या स्वाक्षरीने विशेष परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार -
* मुख्यालयात अभ्यागतांना भेटीसाठी दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेतच प्रवेश असेल.
* विशेष बाबी वगळता मुख्यालयाच्या प्रवेशव्दारामधून सायंकाळी 6.00 नंतर अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच मुख्यालयात असलेल्या अभ्यागतांना सायंकाळी 6.00 पूर्वी मुख्यालय सोडणे बंधनकारक राहील.
* मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना कोणत्या विभागास भेट व कोणत्या अधिकाऱ्यास भेटावयाचे आहे याबाबत खात्री करुन घेऊन व त्यांच्या कामाचे स्वरुप तपासून त्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्राइविंग लायसन्स इ.) पाहून व त्यांची नावासह रजिस्टरमध्ये नोंद घेऊनच मुख्यालयात प्रवेश देण्यात येईल.
* मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक नमुंमपा कर्मचाऱ्याने मुख्यालय इमारतीत प्रवेश केल्यापासून कर्तव्यावर असेपर्यंत म्हणजेच संपूर्ण कार्यालयीन वेळेत ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक राहील.
* नमुंमपा कर्मचारी व नियमित काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांनी स्वत:जवळ ओळखपत्र न बाळगल्यास त्यांना मुख्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही.
* ज्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र हरवले आहे किंवा खूप जीर्ण अवस्थेत आहे, अशा कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र त्वरीत नव्याने बनवुन घ्यावे. अन्यथा त्यांना मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल.
* मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस (अधिकारी, कर्मचारी व इतर अभ्यागत) यांना केवळ गेट क्र.1 मधूनच प्रवेश देण्यात येईल.
* मुख्यालयात कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशी अभियांत्रिकी विभाग व इतर विभागांमार्फत विविध कामे सुरु असल्यास ती करण्यासाठी कामगार येत असतात. सदर कामाबाबत व कामगारांबाबत तसेच मुख्यालयात विविध प्रसंगी आयोजित कार्यक्रमांना येणाऱ्या आयोजकांची व आयोजकांसोबत येणाऱ्या साहित्यांची माहिती सुरक्षा विभागास लेखी स्वरुपात दोन दिवस आधी उपलब्ध करुन देण्यात यावी.
* मुख्यालय इमारतीतून बाहेर जाणाऱ्या वस्तूंना संबंधित विभागाकडून गेटपास देण्यात यावा व तो गेटपास आणि त्यावरील नमूद साहित्य तपासणी करुनच ते साहित्य बाहेर सोडण्यात यावे.
* नमुंमपा मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेसमेंटमध्ये असलेल्या अधिकारी, नगरसेवक व पदाधिकारी यांच्याकरिता राखीव ठिकाणी वाहनांची पार्किंग करु नये.
* मुख्यालयाच्या बेसमेंटमधील वाहनचालक कक्षाजवळील प्रवेशव्दार बंद करण्यात यावे.
नवी मुंबईकर नागरिकांना त्यांची विविध विभागाशी कामे विहित वेळेत करून घेता यावे तसेच अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या कार्यालयीन कामकाजातही व्यत्यय न येता त्यांना सुरळीत कामकाज करता यावे यादृष्टीने सदर नियमावली उपयोगी असून याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्थाही सक्षम होणार आहे.
Published on : 29-10-2021 13:49:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update