प्लास्टिकमुक्ती विषयक स्वयंसेवी संस्थांची कार्यशाळा संपन्न


मानवी जीवनाला अत्यंत हानीकारक असणा-या प्लास्टिकला दैनंदिन वापरातून हद्दपार करण्यासाठी आपल्या घरापासूनच छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्त्या व स्त्री मुक्ती संघटनेच्या मुख्य समन्वयक प्रा. वृषाली मगदूम यांनी सिंगल युज प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात करूया असे आवाहन केले.
'स्वच्छ सर्वेक्षण 2022' अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या महिला मंडळे, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था यांच्या प्लास्टिक निर्मुलन कार्यशाळेप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वाशी विभागाचे विभाग अधिकारी श्री. सुखदेव येडवे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता विषयक कार्यवाही महापालिका प्रशासनाने करावी हा आपल्या मनातील समज काढून टाकण्याची गरज असल्याचे सांगत कमीत कमी कचरा कऱणे व स्वच्छता कार्यात आपले योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत प्रा. वृषाली मगदूम यांनी व्यक्त केले. सगळ्यांनी मिळून करायचे हे काम असून आपल्या एकत्रित सहभागातूनच नवी मुंबईचे स्वच्छतेतील मानांकन उंचावत राहील असे स्पष्ट करीत त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्त्री मुक्ती संघटनेच्या सहयोगाने काही झोपडपट्ट्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या झिरो वेस्ट स्लम मॉडेलच्या यशस्वी कार्यप्रणालीची माहिती दिली. स्वच्छतेचे 3 R म्हणजे कमीत कमी कचरा निर्मिती (Reduce), कच-याचा पुनर्वापर (Reuse) व कच-यापासून पुनर्निर्मिती (Recycle) यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकला नकार हा प्रत्येकाने आपल्या मनाशी निश्चय करावा असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. वर्षा विद्या विलास यांनी आपल्या मनोगतात प्लास्टिक मुक्तीचा नारा हा प्रत्येकाने दिला पाहिजे व तो अनेकांपर्यंत पोहचविला पाहिजे असे सांगत स्वच्छताप्रेमी जागरुक नागरिकांची विविध उपक्रमांतून जोडली जाणारी साखळी नवी मुंबईच्या स्वच्छतेत योगदान देईल व पर्यावरणाचे रक्षण करील असा विश्वास व्यक्त केला. प्लास्टिक पिशवी हलकी आहे, हाताळायला व वापरायला सोपी आहे, भिजत नाही म्हणून तिचा वापर करणा-या प्रत्येकाने असे प्लास्टिक हजारहून अधिक वर्षे नष्ट होत नाही हे लक्षात घेऊन आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करावा व प्लास्टिकला आजपासूनच नकार द्यावा असे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानातील कलम 51 अ नुसार पर्यावरण संरक्षण ही आपली म्हणजेच नागरिकांची जबाबदारी असून पर्यावरणाप्रती जागरुकता दाखवत पर्यावरणाला हानी पोहचविणा-या प्लास्टिकला ठाम नकार द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कोरोना नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेप्रसंगी विविध सेवाभावी मंडळे, संस्था यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 24-12-2021 11:14:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update