*ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीडला रोखण्यासाठी अधिक दक्षतेचे आयुक्तांचे निर्देश*

*नवी मुंबई महानगरपालिका*
प्रसिध्दीकरिता
दि. 24/12/2021
*मागील काही दिवसात कोव्हीड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या तसेच ओमायक्रॉनचे सावट लक्षात घेऊन ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन केले जात असल्याबाबत अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आरोग्य विभाग आणि सर्व विभागांच्या सहा. आयुक्त यांना वेबसंवादाव्दारे आयोजित विशेष बैठकीत दिले.*
*राज्य शासनामार्फत ख्रिसमस सण साजरा करण्याबाबत नियमावली जारी करण्यात आली असून ख्रिसमस व आगामी नववर्ष साजरे करताना नागरिकांनी ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन हे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.*
कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेणा-या नागरिकांचे प्रमाण आता 85 टक्केपेक्षा अधिक झाले असून आपल्या दुस-या डोसचा विहित कालावधी आला की कोणताही विलंब न लावता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे सांगतानाच आयुक्तांनी लसीकरणाव्दारे कोरोनामुळे होणारी आजाराची गंभीरता कमी होते असे स्पष्ट करीत कोणीही लसीकरण टाळू नये असे आवाहन केले आहे.
*सर्वात महत्वाचे म्हणजे लसीकरण झाले तरी कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यंत गरजेचा असून मास्क हीच आपली कोरोनापासून बचावाची ढाल आहे हे लक्षात घेऊन मास्कचा वापर आपल्याच आरोग्यहिताचा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मास्कचा वापर न करून सार्वजनिक आरोग्य हिताला बाधा आणणा-या नागरिकांना त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल समज मिळावी या करिता मास्क विरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विविध दुकाने, आस्थापना याठिकाणीही प्रवेश देताना 'मास्क नाही, लसीकरण नाही तर प्रवेश नाही' हे सूत्र लक्षात ठेवावे असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या दुकाने, आस्थापनांवरही काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथक प्रमुखांना दिलेले आहेत.*
*ख्रिसमस व नववर्षानिमित्त उत्सव साजरा करण्याची पारंपारिक मानसिकता लक्षात घेता कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार सुरक्षित अंतर व नागरिक संख्या मर्यादेची बंधने लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरे करावेत असे नागरिकांना आवाहन करतानाच महापालिका दक्षता पथकांनी पोलीसांच्या मदतीने यावर करडी नजर ठेवावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देशित केले आहे.*
*नव्या नियमावलीनुसार रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंधने घालत जमावबंदी लागू करण्यात आलेली असून त्याचे पालन होत असण्याकडेही लक्ष ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले आहे. लग्न समारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहामध्ये एकावेळी 100 तसेच खुल्या जागेत 250 पेक्षा उपस्थितांची संख्या अधिक नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तितकी उपस्थिती संख्येवर मर्यादा असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावरही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.*
*रेस्टॉरंट, पब, मॉल याठिकाणच्या उपस्थिती संख्या मर्यादेवर विशेष नजर ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले असून या सर्व आस्थापनांनी आपली नियमानुसार 50 टक्के क्षमता जाहीर करून प्रवेशव्दाराजवळ व आतमध्ये 2-3 ठिकाणी दर्शनी जागी फलकावर प्रदर्शित करावी असे आयुक्तांनी निर्देशित केलेले आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील तसेच मुख्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी ख्रिसमस ते नववर्ष या कालावधीत कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणा-यांबाबत कडक राहून नजर ठेवावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी या बैठकीमध्ये दिले. त्या सोबतच कोव्हीड टेस्टींगचे दैनंदिन 10 हजारापर्यंत असलेले प्रमाण जराही कमी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना रूग्ण सापडल्यास त्या इमारतीमध्ये त्वरित सॅनिटायझेशन तसेच तेथील सर्वांचे टारगेटेड टेस्टींग आणि त्याठिकाणी कन्टेनमेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी होण्याकरिताची कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
*ख्रिसमस व नववर्ष हा उत्सवी कालावधी अतिशय जागरूक राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची काटेकोर अंमलजावणी करण्याचा असून याधील हलगर्जीपणा कोव्हीड रूग्णसंख्येत वाढ घडवून आणू शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहून प्रतिबंधात्मक आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असे महापालिका अधिकारी यांना निर्देश देतानाच आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांनीही स्वत:चे व शहराचे आरोग्य जपण्यासाठी हा उत्सवी कालावधी कोव्हीडचा वाढता धोका लक्षात घेऊन आपल्या कुटुंबियांसमवेत साधेपणाने साजरा करावा आणि लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण झाले असो अथवा नसो मास्कचा वापर नियमितपणे करावा असे आवाहन करीत सर्वांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.*
Published on : 25-12-2021 14:11:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update