*"स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" मध्ये 6 जानेवारीपर्यंत सहभागाचे आयुक्तांचे आवाहन*
*नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमध्ये नागरिकांचा नेहमीच सक्रीय सह्रभाग राहिला असून 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्येही 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान व इतर मानांकने प्राप्त होण्यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा सर्वात मोठ्या वाटा असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना स्वच्छता कार्याला नव्या संकल्पनांव्दारे अधिक व्यापकता प्रदान करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज'मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन समाज माध्यमांव्दारे प्रसारित केलेल्या व्हिडिओ क्लिपव्दारे केले आहे.*
केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत समृध्द पर्यावरण साकारण्यासाठी 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज (Swachh Innovative Tenchonolgy challenge)' घोषित करण्यात आले आहे.
यामध्ये नागरिक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, नागरिक समुह, नवे लघुउद्योजक (स्टार्टअप) आणि कॉर्पोरेट्स स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना सादर करून सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजमध्ये सहभाग कालावधीत वाढ करण्यात आली असून आता 6 जानेवारी 2022 पर्यंत shorturl.at/ijuHO या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन गुगल फॉर्म भरून प्रवेशिका सादर केली जाऊ शकते.
या चॅलेंजमध्ये सर्वौत्तम संकल्पना सादर करणा-या पहिल्या 3 क्रमांकाना अनुक्रमे रु. 1 लक्ष, रु.50 हजार, रु.25 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान केली जाणार आहेत. विशेष म्हणजे यामधील उत्तम प्रकल्पांची निवड राज्य स्तर व पुढे राष्ट्रीय स्तरावरही होऊ शकते. नवी मुंबईतील स्पर्धकांकडून सादर केल्या जाणा-या तांत्रिक प्रकल्पांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल असे सांगत आयुक्तांनी नवी मुंबईकर नागरिक यादृष्टीने पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
स्वच्छता कार्यातील नागरिकांचा सहभाग हा केवळ घर व परिसर स्वच्छ ठेवणे यापुरता मर्यादित नाही तर त्यांच्याकडून स्वच्छता कार्याला विकासात्मक दिशा मिळण्याकरिता नवनवीन तांत्रिक संकल्पनाही मांडले जाणे अपेक्षित आहे. यादृष्टीने 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून या माध्यमातून स्वच्छतेमधील नागरिकांची जबाबदारी व कामगिरी अधोरेखीत होऊन नवी मुंबईतील स्वच्छतेला नवे आयाम मिळण्यास मदत होणार आहे. सध्याच्या स्वच्छताविषयक कार्यवाहीमध्ये सकारात्मक सुधारणा व्हाव्यात यादृष्टीने नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना पुढे याव्यात याकरिता हे चॅलेंज लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
स्वच्छता कार्यामध्ये दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलीत करणे, त्याचे वर्गीकऱण कऱणे व त्याची योग्य प्रकारे प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे हे तीन महत्वाचे घटक आहेतच. त्याशिवाय मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टँक यांच्या सफाईत तंत्रज्ञानाचा वापर तसेच सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता हे देखील महत्वाचे घटक आहेत. सार्वजनिक, सामुदायिक शौचालयामध्ये दिवसातील कोणत्याही वेळी गेलात आणि ते स्वच्छ दिसले तर स्वच्छतेबाबतच नव्हे तर संपूर्ण शहराच्या प्रतिमेत लक्षणीय भर पडते असे सांगत ही कामे अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी चॅलेंजमध्ये सहभागी होऊन नागरिकांकडून नवनव्या संकल्पना सूचविल्या जाव्यात अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज'मध्ये दैनंदिन जीवनातून प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध करणे, सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय सूचविणे, मॅन होल टू मशीन होल असे परिवर्तन घडविणे, शून्य कचरा अंमलबजावणी, 3R चा प्रत्यक्ष वापर अशा विविध विषयांवर तांत्रिक संकल्पना सूचवून सहभागी होता येऊ शकते. सहभागी होण्याकरिता विषयांची व्याप्ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर स्वच्छताविषयक कोणत्याही बाबींबाबत नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना सूचविल्या जाऊ शकतात असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
*'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज'कडे केवळ स्पर्धा म्हणून पाहू नये तर दैनंदिन स्वच्छता कार्य अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक संकल्पना सूचवून आपला वैचारिक सहभाग त्यामध्ये नोंदवावा आणि यामधून शहर स्वच्छतेला गतीमानता मिळावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले असून नवी मुंबईतील कल्पक नागरिकांनी सादर केलेला उल्लेखनीय तांत्रिक प्रकल्प राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवडला जाईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.*
Published on : 29-12-2021 12:18:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update