*"स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" स्पर्धा सहभागाकरिता 13 जानेवारीपर्यंत मुदतवाढ*

'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने 'आजादी का अमृत महोत्सव' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Swachh Innovation Tenchonolgy challenge)' घोषित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
*या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता 6 जानेवारी 2022 हा अंतिम दिनांक जाहीर करण्यात आला होता. तथापि सदर चॅलेंजमधील सहभाग आणखी वाढावा या उद्देशाने आता अंतिम मुदतीत वाढ करून 13 जानेवारी 2022 हा स्पर्धा सहभागाचा अंतिम दिनांक घोषित करण्यात आलेला आहे.*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, नागरिक समुह, नवे लघुउद्योजक (Start Up's) आणि कॉर्पोरेट्स हे 'स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज' यामध्ये आपल्या स्वच्छताविषयक अभिनव तांत्रिक संकल्पना सादर करून सहभागी होऊ शकतात.
या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणा-या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वॉर्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने नजरेसमोर ठेवले आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या तंत्र संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतीमानता लाभेल.
या चॅलेंजमध्ये सहभागाच्या दृष्टीने दैनंदिन जीवनातून प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध करणे, नागरिकांमार्फत शून्य कचरा संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, सोसायटी तसेच घरांमध्ये निर्माण होणा-या खताचा वापर करणे, कच-याचे अर्थकारण (Circular Economy of Waste), 'थ्री आर' संकल्पना अर्थात कच-याचा पुनर्वापर (Reuse), कचरा निर्मितीत घट (Reduce) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) प्रत्यक्ष उपयोगात आणणे, रस्ते दत्तक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे - अशा विविध विषयांवरील तांत्रिक कल्पनांवर आधारित प्रकल्प सादर केले जाणे अपेक्षित आहे. ज्यायोगे शहर स्वच्छता कार्याला अधिक नियोजनबध्दता व गतीमानता लाभेल,
या चॅलेंजमधील सहभागाकरिता केवळ वरील विषयांचे बंधन नसून स्वच्छतेच्या अनुषंगाने कचरा वर्गीकरण, संकलन आणि सुयोग्य पर्यावरणशील विल्हेवाट अशा घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण संकल्पनाची मांडणी करणे व याव्दारे दैनंदिन स्वच्छता करणा-या स्वच्छताकर्मींच्या कामात सुधारणा घडवून आणणे तसेच कमीत कमी कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेला जाईल अशाप्रकारे उपाययोजना मांडणे त्याचप्रमाणे प्लास्टिक कच-याचे सुयोग्य व्यवस्थापन तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रणालीतील पारदर्शकतेसाठी उपाययोजना अशा विविध संकल्पनांवर आधारित तांत्रिक प्रकल्प सादर कऱणे अपेक्षित आहे.
या 'नवी मुंबईचे स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज (Navi Mumbai's Swachh Innovation Tenchonolgy challenge)' स्पर्धेमध्ये सर्वौत्तम तंत्र संकल्पना सादर करणा-या पहिल्या 3 क्रमांकाना अनुक्रमे रु. 1 लक्ष, रु.50 हजार, रु.25 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या निवडक स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई स्तरावरील चॅलेंजमधील विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंजमध्ये सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे 13 जानेवारीपर्यंत मुदतवाढ झालेल्या या चॅलेंजमध्ये जास्तीत जास्त स्वच्छताप्रेमी नागरिक, समुह यांनी सहभाग घ्यावा आणि विहित मुदतीत आपल्या अभिनव तांत्रिक संकल्पना https:/rb.gy/zpgcxk या ऑनलाईन गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करून सादर कराव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-01-2022 10:47:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update