*नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहित करणा-या विविध स्वच्छता स्पर्धांचा बक्षिस समारंभ संपन्न*


स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशातील 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमधील सर्वात स्वच्छ शहराच्या नवी मुंबईस मिळालेल्या बहुमानाचे मानकरी प्रामुख्याने स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक आणि दैनंदिन शहर स्वच्छ करणारे स्वच्छताकर्मी असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला त्याच आत्मविश्वासाने सामोरे जाताना नागरिकांचा स्वच्छता कार्यात सहभाग वाढावा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत.
नवी मुंबईत विविध स्तरावर स्वच्छतेचे काम सुरू असून स्वच्छता कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणा-या संस्था, समुह यांना प्रोत्साहन मिळावे व यामधून इतरांनाही प्रेरणा मिळावी यादृष्टीने आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार विविध स्पर्धात्मक स्वच्छता उपक्रम राबविले जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे महापालिका स्तर नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या सर्व संस्था, समुह, नागरिक यांचे अभिनंदन करीत अशा स्पर्धांतून स्वच्छता संदेशाचे आदान-प्रदान होते तसेच संदेश प्रसार होतो अशी जमेची बाजू त्यांनी मांडली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ कोव्हीड प्रतिबंधात्मक नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करीत मोजक्या उपस्थितीत महापालिका मु्ख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये संपन्न झाला. त्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट 'नागरिकांना प्राधान्य (People First)' असे असून त्यादृष्टीने 'माझे शहर - माझा सहभाग' हे आपले घोषवाक्य असल्याचे सांगत उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केंद्र सरकारमार्फत नागरिकांचे शहर स्वच्छतेविषयीचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आलेले दूरध्वनी उचलावेत आणि त्यावर विचारल्या जाणा-या स्वच्छताविषयक प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्यावीत आणि आपल्या शहराला सिटिझन फिडबॅक कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याकरिता कटिबंध्द रहावे असे आवाहन केले.
याप्रसंगी उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र अंगळे, श्रीम. सुषमा पवार, श्री. सुधाकर वडजे, श्री. दिनेश वाघुळदे, श्री. संतोष देवरस, श्री. नितीन महाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छ सोसायटी स्पर्धेत एसबीआय सोसायटी नेरूळ हे प्रथम तसेच त्रिशूल गोल्ड कोस्ट सोसायटी घणसोली हे व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. वाशी येथील फोर पॉईंट हॉटेलने प्रथम आणि विस्टा इन हॉटेलने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. वाशीचे महाराजा मार्केट हे प्रथम तसेच कोपरखैरणे येथील श्रमिक जनता फेरीवाला असो. हे स्वच्छ मार्केट स्पर्धेचे व्दितीय क्रमांकाचे विजेते ठरले.
हिरानंदानी हॉस्पिटल वाशी यांनी प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ रूग्णालयाचे तसेच कोपरखैरणे येथील लायन्स हॉस्पिटल यांनी व्दितीय क्रमांकाच्या स्वच्छ रूग्णालयाचे पारितोषिक स्विकारले. महानगरपालिकेच्या स्वच्छ शाळांमध्ये आंबेडकरनगर रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55 हे प्रथम आणि सानपाडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर शाळा क्र. 116 हे व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, खाजगी शाळांमध्ये डीपीएस स्कुल नेरूळ प्रथम तसेच रिलायन्स फाऊंडेशन स्कुल कोपरखैरणे विजेते व उपविजेते ठरले. ऐरोली येथील जैवविविधता केंद्र हे प्रथम क्रमांकाच्या तसेच बेलापूर येथील भारतीय कपास निगम व्दितीय क्रमांकाच्या स्वच्छ शासकीय कार्यालय पुरस्काराचे मानकरी ठरले.
स्वच्छ चित्रकला स्पर्धेत राम प्रतिक गोरखनाथ, कुणाल सुधीर इटवेकर, खुशबू जितेंद्र यादव हे अनुक्रमे तीन क्रमांकाचे विजेते ठरले. स्वच्छ भित्तीचित्र स्पर्धेत युवराज कोळी, इशा बांडेकर, रूपम सिंग यांनी अनुक्रमे 3 पारितोषिके पटकाविली. स्वच्छ पथनाट्य स्पर्धेत सत्कर्व समुह प्रथम क्रमांक तसेच नाट्य रूची कलामंच व्दितीय आणि मुक्तछंद नाट्यसंस्था तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. स्वच्छ जिंगल स्पर्धेत प्रितेश मांजलकर, कृष्णा देवा आणि महेश मारू यांनी अनुक्रमे 3 पारितोषिके पटकाविली. त्याचप्रमाणे स्वच्छ शॉर्टफिल्म्स स्पर्धेतही बॉटल द डस्टबिन, कोलाज आणि परंपरा हे 3 लघुपट प्रथम 3 क्रमांकाचे मानकरी ठरले.
याप्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची तसेच माझी वसुंधरा रक्षण-संवर्धानाची सामुहिक शपथ ग्रहण केली. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार अत्यंत मोजक्या उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करीत हा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
Published on : 15-01-2022 13:41:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update