*नवी मुंबई्च्या आकर्षक सुशोभित रूपाला गतीमानता देण्याचे निर्देश*
'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना शहराचे मानांकन उंचाविण्याचे उदि्दष्ट नजरेसमोर ठेऊन अधिक गतीमानतेने काम करण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येकाने आपले ध्येय एकच आहे हे लक्षात ठेवून आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी, कर्मचा-यांना आपल्या उद्दिष्टांची जाणीव करून देऊन लक्ष्य साध्य करण्यासाठी काम करावे असे निर्देश केले.
स्वच्छताविषयक कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम सुजाता ढोले व श्री संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री मनोज पाटील व श्री शिरीष आरदवाड आणि इतर कार्यकारी अभियंता, आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.
'नागरिकांचा प्रतिसाद' हा सर्वेक्षणाच्या गुणांकनातील एक महत्वाचा भाग असून यावर्षी तरुणाई व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता विशेष प्रश्नावली आहे. या गोष्टीची विशेष नोंद घेत या वयोगटांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छता संदेश पोहचविण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
*शहर सुशोभिकरण कामे चांगल्या रितीने सुरू असून त्याविषयी नागरिकांचे तसेच प्रसार माध्यमांचे सकारात्मक अभिप्राय मिळत आहेत. यावर्षी त्यामध्ये सायन पनवेल महामार्ग व रेल्वे रूळांच्या दोन्ही बाजूच्या भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून सर्वच सुशोभिकरण कामांना अधिक गतीमान करण्याचे निर्देशित करतानाच त्या कामामध्ये कल्पकता व व्यापकता आणण्याचे आयुक्तांनी सूचित केले. यावर्षी नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळी मुख्य ठिकाणी त्या भोवती कवितेच्या आशयाला साजेशी सजावट करुन सुलेखनाव्दारे प्रदर्शित करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. त्यानुसार शहरातील महत्वाच्या जागा निवडण्याचे अभियांत्रिकी वर्गाला सूचित करण्यात आले असून या संकल्पनेव्दारे शहर सुशोभिकरणाप्रमाणेच वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.*
कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रांठिकाणी टर्शअरी ट्रिटमेन्ट प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून हे प्रक्रियाकृत पाणी लवकरात लवकर एमआयडीसीला पुरवठा करणेबाबत कार्यवाही सुरु करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. त्याचप्रमाणे इतर मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा उपयोग एनआरआय प्रमाणेच आणखी काही सोसायटया, बांधकामे, कामे या ठिकाणी कशा प्रकारे करता येईल याबाबतही कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशित करण्यात आले.
6 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील महापौर परिषदेत पंतप्रधान महोदयांनी स्वच्छ सर्वेक्षणामुळे देशभरातील गावा-शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे सांगत स्थानिक पातळीवरही अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे सूचित केले होते. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक कार्यवाही करीत *विभाग कार्यालय पातळीवर स्वच्छता गुणांकन करण्यास सुरूवात केलेली आहे. या गुणांकनाकरिता 15 विविध प्रकारचे उपक्रम निश्चित करण्यात आलेले आहेत. या गुणांकनानुसार दर महिन्यात सर्वोत्कृष्ट विभाग निवडून त्याला मानांकित करण्यात येईल व याची सुरूवात 26 जानेवारीपासून होईल असे आयुक्तांनी सांगितले. या माध्यमातून स्वच्छताविषयक निकोप स्पर्धात्मक वातावरण निर्मिती होऊन स्वच्छता कार्याला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.*
प्लास्टिक प्रतिबंध हा एक महत्वाचा विषय असून स्थानिक पातळीवर प्लास्टिक विरोधी मोहिमा तीव्र करुन आपल्या विभागात प्रतिबंधात्मक प्लास्टिक दिसणारच नाही अशा प्रकारे कार्यवाहीतून संदेश प्रसारित होईल असे निर्देश आयुक्तांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी असणारा सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्प पूर्ण क्षमतेने नियमीत कार्यन्वित राहील याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
आत्मनिर्भर सोसायटी, पेट कॉर्नर, प्लॉग रन यासारखे सुरू असलेले उपक्रम योग्य रितीने कार्यान्वित राहतील व त्याची व्यापकता वाढेल याचीही दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची क्षमता असून आपण केलेल्या कामांवर समाधानी न राहता त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करुन शहराला अधिक स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी कृत्तीशील होण्यासाठी कायम तत्पर रहावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सूचित केले.
Published on : 18-01-2022 15:55:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update