*लांब अंतराच्या एनएमएमटी बसेसमध्ये आता चालते-फिरते ग्रंथालय (#BooksInBus)*
*मंत्रालयासारख्या लांब अंतराच्या बसमार्गांवरील प्रवाशांकरिता एनएमएमटी बसेसमध्ये लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून चालते फिरते ग्रंथालय उपलब्ध करून देणे ही संकल्पनाच आगळीवेगळी असून बसेसमध्ये वाचनासाठी सहजपणे पुस्तके उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी सार्थकी लागेल आणि या माध्यमातून वाचनसंस्कृती वृध्दींगत होईल असा विश्वास नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.*
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 26 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एनएनएमटी बसेसमध्ये प्रवाशांसाठी मराठी, इंग्रजी भाषेतील वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देणा-या 'बुक्स इन बस (#BooksInBus)' या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. *अशाप्रकारे प्रवासी वाहतुक सेवमध्ये ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.* याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता श्री.अजय संख्ये, श्री. मदन वाघचौडे व श्री. सुनिल लाड, लेखक श्री.सुधीर सूर्यवंशी तसेच लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
*पहिल्या टप्प्यात लांब अंतराच्या 3 बसमार्गांवरील बसेसमध्ये ही ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून भविष्यात बसेसच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांचा बसमधील वेळ पुस्तक वाचनातून ज्ञानवृध्दीसाठी सार्थकी लागावा ही भूमिका या नाविन्यपूर्ण उपक्रमातून जपण्यात आलेली आहे. यामध्ये विविध वयोगटातील प्रवाशांना वाचायला आवडतील अशी विविध विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील नामवंत लेखकांची वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पुस्तकांची निवड लेट्स रिडच्या माध्यमातून अत्यंत चोखंदळपणे करण्यात आलेली असून पुस्तकांबाबतचे प्रवाशांचे अभिप्राय घेऊन त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करण्यात आल्यास ती पुस्तकेही उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.*
*याशिवाय या बसेसमधील प्रत्येक सीटच्या बाजूला क्यू आर को़ड प्रदर्शित करण्यात आलेले असून ते प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर पुस्तकांविषयी तसेच ग्रंथविषयक उपक्रमांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. आगामी काळात क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या आवडीची ई बुक्स वाचनाची तसेच ऑडिओ बुक्स ऐकण्याची अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.*
*या बसेसमधील एक विशेष लक्षवेधी बाब म्हणजे बसेसमध्ये उभे राहिल्यानंतर आधारासाठी पकडावयाच्या हँडलमध्ये मराठी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ व पुस्तक वाचनासंबंधीत वाचनीय अवतरणे (कोट्स) लावण्यात आलेली आहेत.*
*राज्यभरातील गावागावात ग्रंथप्रेमाचे लोण पसरावे याकरिता अत्यंत पायाभूत पातळीपासून काम करणा-या लेट्स रिड इंडिया फाऊंडेशच्या वतीने एनएमएमटी बसेसमधील ग्रंथालयाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.* यापूर्वीही महानगरपालिकेच्या बहुचर्चित सिडको कोव्हीड सेंटरमध्ये लेट्स रिडने राबविलेला ग्रंथालयाचा अभिनव उपक्रमही राज्यात नावाजला गेला. तसेच महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयाच्या निर्मितीमध्येही लेट्स रिडचे अनमोल असे योगदान लाभले होते. अशाप्रकारे *वाचन चळवळ उभी राहण्यासाठी समर्पित भावनेने विनामूल्य सहयोग देणा-या लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनच्या कामाची विशेष प्रशंसा करीत आयुक्तांनी आभार मानले.*
*बसने प्रवास करणा-या प्रवाशांना दर्जेदार ग्रंथसंपदा विनामूल्य उपलब्ध करून देणा-या या अभिनव संकल्पनेचे कौतुक कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असणा-या नागरिकांनी केले व प्रवासी आता मोबाईलवर काहीतरी वाचत बसून वेळ घालविण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचून माहिती व ज्ञानात भर घालतील अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. लोक वाचनासाठी आता एनएमएमटी बसने प्रवास करतील अशा उत्स्फुर्त प्रतिक्रियाही उपस्थितांमार्फत व्यक्त करण्यात आल्या.*
Published on : 23-01-2022 13:40:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update