*सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी खुलविले 'स्वच्छतेचे अक्षररंग'*

'प्रजासत्ताक दिन, लोकशाहीचा सण, पहिल्या नंबरचा केला, निश्चय मनोमन' अशी आकर्षक शब्दाक्षरे 25 फूट लांबीच्या मोठ्या कागदावर रेखाटत सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 'स्वच्छतेचे अक्षररंग' खुलविले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असून 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' अंतर्गत महापालिका मुख्यालयात हा चित्राक्षरांचा लक्षवेधी उपक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री. अच्युत पालव यांचेसमवेत महापालिका क्षेत्रातील विविध शाळांतील 10 कलाशिक्षक तसेच महानगरपालिकेच्या वतीने बालदिनी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ चित्रकला स्पर्धा यामधील 18 गुणवंत विद्यार्थी चित्रकारांनी सहभाग घेत या चित्राक्षरांच्या कागदावर आकर्षक बाह्य सजावट केली.
'स्वच्छ भाषा, स्वच्छ वेश, स्वच्छ राखूया, आपला देश' असा संदेश साकारतानाच महापालिका मुख्यालयाच्या प्रतिकृती रेखाटनाखाली 'निश्चय केला, नंबर पहिला' हे स्वच्छ नवी मुंबई अभियानासाठीचे घोषवाक्य सुलेखनातून साकारत श्री. अच्युत पालव यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही आकर्षक अक्षर रेखाटनातून दिल्या.
सातासमुद्रापल्याड विविध देशांमध्ये देवनागरी मराठी भाषेची गौरवशाली पताका सुलेखनाच्या माध्यमातून फडकविणा-या श्री. अच्युत पालव यांच्यासारख्या सुप्रसिध्द कलावंतासोबत इतक्या मोठ्या कॅनव्हासवर रेखाटन करण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी चित्रकार तसेच कलाशिक्षक यांना मिळाली. याव्दारे त्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देत प्रोत्साहित करण्यात आले.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री.संजय काकडे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी यांनी याप्रसंगी उपस्थित राहून या नाविन्यपूर्ण उपक्रमाला व सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांच्या कलाविष्काराला दाद दिली. या उपक्रमांतर्गत साकारलेल्या स्वच्छतेच्या अक्षररंगामुळे स्वच्छता संदेश प्रसारणाप्रमाणेच अक्षर सुलेखनातून मराठी भाषेचा आकर्षक अविष्कारही साकारला.
Published on : 27-01-2022 11:56:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update