*स्वच्छतेविषयी जागरूकता दाखवित वाढदिवसाच्या समारंभात शून्य कचरा उपक्रम*
.jpeg)
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांना त्यांचे विविध सभा, समारंभ थ्री आर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन कऱण्यात आलेले आहे व त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.
अशाचप्रकारे शिंदे कुटुंबियांनी नवी मुंबईतील बेलापूर येथील प्रणाम हॉटेलमध्ये साजरा झालेला ऊर्वी या आपल्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ‘शून्य कचरा’ संकल्पनेस अनुसरून साजरा केला.
या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीकचा जराही वापर करण्यात आला नाही. यामध्ये जेवणाकरीता सुपारीच्या झाडापासून बनविलेल्या ताटांच व चमच्यांचा (Bio degradable environment friendly) वापर करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या सजावटीकरीता रंगीत कागदाचा, कापडाचा व बॅनर्सकरिता कार्डबोर्डचा वापर करण्यात आला. मुलांना रिटर्न गिफ्ट देतानाही ज्यूट बॅग तसेच रिसायकल पध्दतीने केलेल्या डायऱ्या व स्टिलच्या पाण्याच्या बाटल्या भेटीदाखल देण्यात आल्या.
पाणी आणि सरबत पिण्याकरीता कागदाच्या (Bio degradable environment friendly drinking cup) तसेच काचेच्या ग्लासचा वापर करण्यात आला. कार्यक्रम झाल्यानंतर उरलेले अन्न ‘लेट्स फिटनेस सेलिब्रेट’ या सेवाभावी संस्थेस गरीबांना वाटप करण्याकरिता देण्यात आले.
या कार्यक्रमाठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथे ओला व सुका कचरा टाकण्याकरिता स्वतंत्र कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यावर ‘माझा कचरा - माझी जबाबदारी’ असा संदेश तसेच वॉश बेसिनजवळ 'पाणी वाचवा' असा संदेश दर्शनी भागी प्रदर्शित करण्यात आला होता. प्रत्येक टेबलवर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते.
अशाप्रकारे स्वच्छतेविषयी व घनकचरा व्यवस्थापन नियमांविषयी जागरूक राहून अगदी कौटुंबिक समारंभामध्येही स्वच्छता नियमांचे पालन करणा-या शिंदे कुटुंबियांच्या स्वच्छताप्रेमाचे कौतुक करण्यात येत आहे.
Published on : 03-02-2022 14:09:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update