*स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईला अग्रभागी ठेवण्यासाठी सोसायट्यांचाही पुढाकार*
शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी तो वेगवेगळा ठेवला जाणे व वेगवेगळा दिला जाणे गरजेचे असून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो अशा सोसायट्यांच्या ठिकाणी त्यांच्या आवारातच ओल्या कच-याची खत निर्मिती प्रकल्प राबवून विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे.
नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नेहमीच आघाडीवर राहिले असून यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई देशातील प्रथम क्रमांच्या सर्वात स्वच्छ शहराची मानकरी ठरली आहे. यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सक्रीय सहभागाचे सर्वात मोठे योगदान असून नवी मुंबई शहराकडून फार मोठ्या अपेक्षा राज्य व राष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येतात.
त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे सोसायटीच्या सदस्यांकडून घरोघरी कचरा वर्गीकरण केले जाते त्याच्या एक पाऊल पुढे जात सोसायटीच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार तसेच शहराच्या नावलौकीकासाठी महत्वाचा आहे. असे प्रकल्प राबविण्याकरिता फार मोठी जागा लागत नाही व त्याचे तंत्रज्ञानही वापरण्यास सोपे आणि सुविधाजनक आहे. बाजारात अशा प्रकल्पांची वैविध्यपूर्ण यंत्रे उपलब्ध असून शास्त्रोक्त पध्दतीने हा प्रकल्प योग्य रितीने राबविला तर त्यापासून दुर्गंधही येत नाही.
जगभरातील विकसित देशांमध्ये असे तंत्रज्ञान वसाहती, सोसायट्या यामध्ये यशस्वीरित्या राबविले जात असून प्रत्येक बाबतीत नेहमीच आघाडीवर असणा-या नवी मुंबई शहरानेही त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार असे प्रकल्प राबविणे बंधनकारक असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीत सुरुवातीला छोट्या प्रमाणात का होईना ओल्या कच-यापासून खत निर्मिती प्रकल्पाची सुरुवात करायला हवी व हळूहळू त्या प्रकल्पाची क्षमता वाढवायला हवी.
या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती होते त्याचे पुढे करावयाचे काय? असा प्रश्नही अनेक सोसायट्यांकडून विचारला जात असून सोसायटीच्या वापराएवढे खत सोसायटीसाठी ठेऊन अधिकचे खत नवी मुंबई महानगरपालिका उद्याने व हरीतपट्टे यामधील वापरासाठी घेऊन जाईल. सोसायटीतील अगदी लहानशा जागेपासूनही अशा प्रकल्पाची सुरुवात करणे शक्य असून ज्या सोसायट्यांमध्ये असे प्रकल्प राबविण्यासाठी जागांची अडचण आहे अशा सोसायटी पदाधिका-यांनी संबंधित विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील.
नवी मुंबई शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत नेहमीच कृतीशील असल्याने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईचे मानांकन सतत उंचावत राहिले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, संस्था, आस्थापना यांनी आपल्या ओल्या कच-याची स्वत:च विल्हेवाट लावणे गरजेचे आहे व याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अनेक सोसायट्यांमध्ये असे प्रकल्प यशस्वीरित्या राबविले जात असून इतरही सोसायट्यांना यासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-02-2022 06:18:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update