*"स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज"मध्ये रामराव आदिक इन्स्टिट्यूट, नेरुळ प्रथम क्रमांकाचे मानकरी*
नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व त्यामध्ये नागरिक सहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे.
अशाच प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे औचित्य साधून आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांच्या कल्पनाशक्तीला मुक्त व्यासपीठ देऊन स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना मांडण्याची संधी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यामध्ये आयुक्तांच्या संकल्पनेनुसार पुढाकार घेत "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" घोषित केले होते. यामध्ये 39 स्पर्धकांनी सहभागी होत स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, नागरिक समुह, स्टार्ट अप्स, शाळा / महाविद्यालय, उद्योग समुह (तंत्रज्ञान / बिगर तंत्रज्ञान) अशा विविध स्तरांतून प्राप्त 39 तांत्रिक प्रस्तावांतून रामराव आदिक, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. डि.वाय.पाटील विद्यापीठ नेरुळ यांनी सादर केलेल्या सोलार पॉवर्ड वॉटर ट्रॅश कलेक्टर या तांत्रिक प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे रु. 1 लक्ष रक्कमेचे पारितोषिक प्राप्त झाले. या तांत्रिक समुहाच्या प्रमुख श्रीम. अनुश्री मोरे आणि समुह सदस्य श्रीम. संजना जंगम व श्रीम. रोशनी धवले यांनी प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्हासह पारितोषिकाचा स्विकार केला. डॉ. जयानंद गावंडे हे या प्रकल्प समुहाचे मार्गदर्शक होते.
"स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" निवड समितीच्या अध्यक्ष तथा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते, समितीचे सदस्य सचिव तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, समितीचे सदस्य डॉ. शरद पी जाधव व हार्डवेअर इंजिनियर श्री. प्रविण पाटील तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
सदर स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाचे रु. 50 हजार रक्कमेचे पारितोषिक रामराव आदिक, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. डि.वाय.पाटील विद्यापीठ नेरुळ येथील प्रथमेश पाटील प्रमुख असलेल्या समुहाने पटकाविले. डॉ. मनोज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रसाद पितृभक्त, श्री. जयेश पाटील, श्री. ऐमान शेख या समुह सदस्यांनी मशिन होल डिटेक्शन ॲण्ड मॉनिटरिंग सिस्टीम या प्रकल्प निर्मितीत महत्वाचे योगदान दिले.
फादर एग्नेल महाविद्यालय वाशी यांच्या श्री. आदित्य बास्कर प्रमुख असलेल्या तांत्रिक समुहाने ऑटोमेटेड ह्युमन फॉलोईंग वेस्ट बिन कार्टस् या प्रकल्प सादरीकरणाबद्दल तृतीय क्रमांकाचे रु. 25 हजार रक्कमेचे पारितोषिक स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रासह स्विकारले. डॉ. इक्लिम सिध्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माल्कम डियास, श्री. कुशल चव्हाण, श्री. नागेश्वर आव्हाड यांनी या तांत्रिक प्रकल्प निर्मितीत मौलीक योगदान दिले.
या चॅलेंजमधील महानगरपालिका पातळीवरील प्रथम तीन क्रमांकाचे प्रकल्प राज्य पातळीवर पाठविण्यात आले असून राज्य पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येणा-या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा समावेश असावा यासाठी विजेत्या प्रकल्पांच्या समुहांना शुभेच्छा देण्यात आल्या.
दैनंदिन स्वच्छता कार्यात अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून सुधारणा घडवून आणणा-या नव्या संकल्पनांची निर्मिती आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन राबविण्यात आलेल्या "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" मध्ये उत्तम प्रतिसाद लाभला. अशाप्रकारे नागरिक सहभागातून स्वच्छता कार्याला अधिक गतीमानता लाभेल असा विश्वास यावेळी उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केला.
Published on : 24-02-2022 13:46:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update