रविवारी २७ फेब्रुवारीला नवी मुंबईत ७२२ बुथवर पोलिओ लसीकरण
१९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येते. अशीच पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राबविली जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाची संपूर्ण सज्जता केलेली आहे.
० ते ५ वयोगटातील ८८३३० बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवून मोहीमेचे नियोजन करण्यात आले असून त्याकरिता २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात ६०० स्थायी, ९४ ट्रान्झिट व २८ फिरते मोबाईल असे एकूण ७२२ पोलिओ लसीकरण बूथ कार्यरत असणार आहेत.
ही लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून योग्य पध्दतीने लसीकरण करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत. या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून पोस्टर्स, बॅनर्स, रिक्षातून उद् घोषणा अशा विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयाच्या मुलांना नजिकच्या केंद्रावर नेऊन पोलिओ लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 03-03-2022 06:01:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update