*कोव्हीडच्या दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई राज्यात नंबर वन शहर*
16 जानेवारीपासून आरोग्यकर्मींपासून सुरू झालेल्या कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात आल्याने 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोव्हीड लसीच्या दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे.
नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस घेणे सोपे जावे याकरिता महानगरपालिकेने 111 पर्यंत लसीकरण केंद्रे सुरू करून लसीच्या उपलब्धतेनुसार केलेले लसीकरणाचे सुयोग्य नियोजन आणि आरोग्याविषयी जागरूक नवी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी म्हटले असून कोव्हीडचा प्रभाव कमी झाला असला तरी कोव्हीड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी न चुकता विहित वेळेत आपला तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन केले आहे.
लसीकरण झालेले असल्यामुळे कोव्हीडचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र तिस-या लाटेत अनुभवता आले. याविषयी महानगरपालिका सुरूवातीपासूनच जागरूक असल्याने महापालिका क्षेत्रातील कोव्हीडच्या प्रसाराची व्याप्ती मर्यादित राखण्यात यश लाभले. कोव्हीड लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेने दुस-या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्या अनुषंगाने शासनामार्फत महानगरपालिकेस देण्यात आलेले 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे 11,07,000 इतके उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पार केले असून आजतागायत 11,07,454 नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. यामध्ये -
लाभार्थी
|
पहिला डोस
|
दुसरा डोस
|
प्रिकॉशन डोस
|
आरोग्य कर्मी (HCW)
|
34494
|
23061
|
7139
|
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW)
|
30867
|
22051
|
7241
|
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
|
100011
|
99663
|
21420
|
45 ते 60 वयोगटातील नागरिक
|
245086
|
231853
|
-
|
18 ते 45 वयोगटातील नागरिक
|
841886
|
730826
|
-
|
- असे लसीकरणाचे प्रमाण आहे.
18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाप्रमाणेच 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासही 3 जानेवारी 2022 पासून सुरूवात करण्यात आलेली असून त्यांच्या पहिल्या डोसचेही 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे व दुस-या डोसचेही लसीकरण गतीमानतेने पूर्ण करून घेण्यात येत आहे.
याशिवाय 10 जानेवारीपासून तिस-या अर्थात प्रिकॉशन डोसच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली असून त्यामध्येही 7139 आरोग्यकर्मी, 7241 पहिल्या फळीतील कोरोनायोध्दे तसेच 21420 इतके 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशाप्रकारे एकूण 35800 नागरिकांनी दुस-या डोसनंतर 90 दिवसांनी अथवा 36 आठवड्यांनी देण्यात येणा-या प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे.
कोव्हीड लसीकरणाचे नियोजन करताना त्यामध्ये विविध सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो असे कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचे व्यावसायिक घटक (Superspraders) यांच्या लसीकरणाला विशेष सत्रे आयोजित करून प्राधान्य देण्यात आले. 18564 सुपरस्प्रेडर्सच्या लसीकरणामध्ये - मेडिकल स्टोअर कर्मचारी (746), हॉटेल कर्मचारी (5826), सलून व ब्युटी पार्लर कर्मचारी (1266), पेट्रोल पम्प कर्मचारी (428), टोल नाका कर्मचारी (257) तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी (236), घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार (2864), ऑटोरिक्षा / टॅक्सी वाहनचालक (4385), सोसायटी वॉचमन (2556) अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती (Potential Superspreders) यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.
त्याचप्रमाणे बेघर - निराधार व्यक्ती (120), तृतीयपंथीय (124) यांचेकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही (98) विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. समाजातील कोणताही घटक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये याची सर्वोतोपरी काळजी घेत तशा प्रकारचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले व त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे करण्यात आली.
अशाप्रकारे नियोजन करीत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महानगरपालिकेची 4 रूग्णालये, वाशी येथील इएसआयएस रूग्णालयातील जम्बो सेंटर, 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी नियमित लसीकरण करण्यात आले. रूग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांनी रांग न लावता प्राधान्याने लसीकरण करण्यात आले.
याशिवाय महानगरपालिकेची विविध भागांतील समाजमंदिरे, शाळा, सांस्कृतिक भवने याठिकाणी केंद्रे, सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल व इनॉर्बिट मॉल वाशी या 2 मॉल्समध्ये ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा, विष्णुदास भावे नाट्यगृह येथील जम्बो केंद्र, एपीएमसी मार्केट येथे दाणा बाजारर व भाजी मार्केट येथील विशेष केंद्रे, जुईनगर रेल्वे कॉलनी आरोग्य केंद्र, 6 रेल्वे स्टेशनवर (20122) स्थायी केंद्रे अशाप्रकारे व्यापक स्वरूपात लसीकरण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली व नागरिकांना अत्यंत सुलभपणे लस घेण्याची व्यवस्था करण्यात आली.
याशिवाय शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'कवचकुंडल अभियान' व 'हर घर दस्तक अभियाना'ची (58369) प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले. (669)
दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले, (203)
अंथरूणावर खिळलेल्या रूग्णांचे (826) घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.
गर्भवती महिला (685) व स्तनदा मातांसाठीही (515) विशेष लसीकरण सत्र राबविण्यात आले.
महिला दिन, दिव्यांग दिन अशा विशेष दिनी त्या त्या घटकांसाठी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली.
आधारकार्ड नसलेल्या व्यक्तींकरिताही विशेष संगणकीय प्रणालीव्दारे लसीकरण (231) करण्यात आले.
याशिवाय, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 'लसीकरण आपल्या दारी' ही विशेष मोहीम राबविण्यात आली व नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना लसीकरण कार्ड देत त्यांच्या घराजवळ 12546 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
दुर्गम भागातील लसीकरणावरही लक्ष केंद्रीत करीत मोबाईल व्हॅनव्दारे 931 ठिकाणांवर जाऊन 18144 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे मार्केटमधील वर्दळीच्या जागांवरही मोबाईल व्हॅन उभी करून लसीकरणावर भर देण्यात आला.
जास्तीत जास्त नागरिकांचे जलद लसीकरण हे सूत्र ठेवल्याने कोव्हीडचा प्रभाव मर्यादित राखण्यात यश आल्याचे चित्र दिसून आले.
या सर्वांचा परिपाक म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड 19 लसीकरणात नेहमीच आघाडीवर राहिली व कोव्हीडच्या पहिल्या डोस प्रमाणेच दुसरा डोसही जलद पूर्ण करणारे राज्यातील नंबर वन शहर ठरले आहे. याचे श्रेय नवी मुंबईकर नागरिकांच्या जागरूकतेला देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अद्यापही कोव्हीडचा डोस घेण्याचे बाकी असलेल्या नागरिकांना विहित वेळेत कोव्हीडचा डोस जलद घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कोव्हीडच्या तिस-या अर्थात प्रिकॉशन डोससाठी पात्र असणा-या ज्येष्ठ नागरिकांनीही योग्य वेळी आपला प्रिकॉशन डेस न चुकता घ्यावा व लस संरक्षित व्हावे असे आवाहन केले आहे. कोव्हीड अद्याप संपलेला नसल्याने कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी प्रकर्षाने नमूद केले आहे.
Published on : 12-03-2022 15:15:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update