*चित्रकविताभिंत साकारत सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांची शहर सुशोभिकरणाला नवी झळाळी*

"स्वच्छ सर्वेक्षण 2022" ला सामोरे जाताना शहर सुशोभिकरणाच्या नानाविध संकल्पना राबवित नवी मुंबई शहर अधिक आकर्षक रुपात नटलेले असल्याचे अभिप्राय नवी मुंबईकर नागरिक तसेच शहराला विविध कारणांनी भेटी देणा-या प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहेत. यामध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, रहेजा, रचना संसद अशा नामांकित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित शहराचे स्वरुप बदलून टाकले आहे.
यामध्ये अधिक आकर्षकता आणण्याच्या दृष्टीने नेहमीच्या सर्वसाधारण जनजागृतीपर संदेश व घोषवाक्यांच्या पलीकडे जात नामांकित कवींच्या प्रसिध्द कवितांनी शहरातील काही भिंती सजविण्याची संकल्पना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी मराठीतील नामांकित कवींच्या तीसहून अधिक प्रसिध्द कवितांच्या ओळी सुलेखनातून साकारलेल्या आहेत. या कवितांच्या ओळी शहरातील महत्वाच्या ठिकाणी चित्रभिंतींवर रेखाटल्या जात असून यामधील एक विशेष लक्षवेधी भिंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरून पामबीच रोडवरून सेक्टर 50 कडे वळणा-या मार्गाच्या कॉर्नरला उभारण्यात आलेली असून या भिंतीवर सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील "दुरिताचे तिमिर जावो l विश्वस्वधर्म सूर्ये पाहो l जो जे वांछिल तो ते लाहो l प्राणिजात ll" ही ओवी आपल्या कलात्मक सुलेखनातून रेखाटलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य "सर्वेSपि सुखिन: सन्तु" असून श्री. अच्युत पालव यांनी रेखाटलेली पसायदानातील ओवी ही महानगरपालिकेच्या ब्रीदवाक्याच्या भावार्थाशी सुसंगत आहे. नवी मुंबईचा क्विन्स नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग हा शहरातील सर्वात लक्षवेधी मार्ग असून महानगरपालिका मुख्यालयाजवळील सेक्टर 50 कडे वळणा-या मार्गाच्या कॉर्नरवर सिग्नलजवळ चोहोबाजूंनी नजरेस पडेल अशा ठिकाणी ही भित्तीकविता चितारण्यात आली आहे.
*स्वच्छतेमधील नवी मुंबईचे राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचे मानांकन ही नवी मुंबईचा नागरिक म्हणून मला अभिमानाची गोष्ट वाटते आणि स्वच्छतेबरोबरच सुशोभिकरणाकडेही बारकाईने लक्ष देत काम केले जात आहे याचेही विशेष कौतुक वाटते. त्यामुळे शहर सुशोभिकरणात नामवंत कवींच्या कवितांच्या ओळी शहरात ठिकठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे ही आयुक्तांनी मांडलेली संकल्पनाच दाद देण्यासारखी असून देशात आत्तापर्यंत कुठेही न झालेल्या अशाप्रकारच्या अभिनव उपक्रमात सुलेखनकार म्हणून माझ्या शहरासाठी मला योगदान देता आले याचा आनंद श्री. अच्युत पालव यांनी भित्तीकविता चितारल्यानंतर व्यक्त केला.*
*शहरातील महत्वाचे चौक, जागा येथे साकारलेल्या भित्तीकवितांवरील कवींच्या ओळी वाचून ती संपूर्ण कविता वाचनाची ओढ बघणा-यांच्या मनात निर्माण होईल व यामधून वाचन संस्कृतीचा विकास होईल. त्याचप्रमाणे आकर्षक सुलेखनातील कवितांच्या ओळी व कवितेमधील अर्थाला साजेसे कलात्मक चित्र नागरिकांना या कवितांच्या ओळींसमवेत सेल्फी छायाचित्र काढण्याची इच्छा निर्माण करेल व या माध्यमातून मराठी साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.*
Published on : 14-03-2022 11:41:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update