*होल्डींग पाँड मधील गाळ काढून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याकरिता एम.सी.झेड.एम.ए.कडे परिपूर्ण प्रस्ताव सादर*
समुद्रसपाटीपासून खाली वसलेल्या नवी मुंबई शहराला पावसाळी कालावधीमध्ये पडणारे पावसाचे पाणी साठवून शहरात विविध ठिकाणी असलेले होल्डींग पाँड सुरक्षा प्रदान करतात. तथापि या होल्डींग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्याने व कांदळवन वाढल्याने त्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. या होल्डींग पाँड्समध्ये कांदळवन असल्याने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) तसेच वन विभाग यांची परवानगी घेतल्याशिवाय गाळ काढून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे शक्य नाही.
पावसाळी कालावधीत नवी मुंबईतील किना-यालगतच्या काही भागातील घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने होल्डींग पाँडची गाळ काढून सफाई करण्याच्या कामाकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) कडे सातत्याने पाठपुरावा सुरु असून उच्च अधिकारी स्तरावर बैठकाही पार पडल्या आहेत.
महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) यांनी याबाबत सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महानगरपालिकेस दिलेल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आय.आय.टी. मुंबई आणि सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी ॲण्ड नॅचरल हिस्टरी (SACON) यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी करून घेऊन प्राथमिक पाहणी अहवाल प्राप्त केलेला आहे.
सदर आय.आय.टी. मुंबई आणि सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी ॲण्ड नॅचरल हिस्टरी (SACON) यांच्या कडून प्राप्त अंतरिम अहवालावर विशेष बैठक आयोजित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सदर अंतरिम अहवाल व प्रस्ताव महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) कडे त्वरित सादर करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. तसेच पावसाळ्यापूर्व करावयाच्या कामांचे तातडीने नियोजन करण्यात यावे असेही आदेशित केले.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, तांत्रिक सल्लागार श्री. शरद टंडन उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कांदळवनाला हानी न पोहचता होल्डींग पाँडची साफसफाई करताना प्रायोगिक स्वरुपात प्राधान्याने सीबीडी बेलापूर सेक्टर 12 येथील होल्डींग पाँड तसेच वाशी सेक्टर 8 येथील होल्डींग पाँडची साफसफाई करण्याची परवानगी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) यांच्याकडे मागण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तेथील परवानगी प्राप्त झाल्यानंतर ती कामे करून त्याची केस स्टडी केली जाणार आहे व त्याची यशस्वीता पाहून इतरही होल्डींग पाँडमध्ये कार्यवाही करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
पावसाळीपूर्व कालावधीत होल्डींग पाँड़मधील गाळ काढणे करिता तेथे पंप बसविणे, फ्लॅप गेट्स बसविणे, पावसाळी पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून जलप्रवाह वाहता करणे अशा कामांकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी (MCZMA) कडे प्रस्ताव सादर करताना समांतररित्या पावसाळीपूर्व कामे करण्याची कार्यालयीन प्रक्रिया सुरु करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खाली वसलेले असल्यामुळे ठिकठिकाणी असलेले 11 होल्डींग पाँड शहराला सुरक्षा प्रदान करतात. सद्यस्थितीत या होल्डींग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांची पाणी साठविण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे भरतीच्या कालावधीत पाऊस पडत असेल तर शहराच्या काही भागात पाणी साठण्याचे प्रसंग घडतात व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचे व्यापक हित लक्षात घेऊन हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघावा याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आग्रही असून होल्डींग पाँडमधील गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्याकरिता सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जात आहे.
Published on : 22-03-2022 05:50:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update