*कंत्राटी कर्मचा-यांच्या 'समान काम - समान वेतन' समितीसोबत आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांची विशेष बैठक*
विविध नागरी सेवा सुविधांची परिपूर्ती करताना कंत्राटी कर्मचा-यांना 'समान काम - समान वेतन' लागू करण्याबाबत कायद्यांमधील तरतूदींविषयी अभ्यास करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर विशेष समिती नियुक्त करण्यात आली असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या समितीसोबत विशेष बैठक घेत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, विधी अधिकारी श्री. अभय जाधव हे अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वीही सोमवार दि. 14 मार्च रोजी आयुक्तांनी समितीसोबत चर्चा करून द कॉन्ट्रॅक्ट लेबर सेंट्रल रुल्स 1971 मधील सेक्शन 25(2)(V) अन्वये 'समान काम - समान वेतन' लागू करण्याबाबत कार्यवाही करताना कंत्राटदारामार्फत कार्यरत असणारे कर्मचारी यांना 'समान काम - समान वेतन' लागू करणेबाबत कायद्यातील तरतूदी तसेच इतर महानगरपालिकांमधील याबाबतची प्रचलित कार्यवाही याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.
त्याचप्रमाणे याविषयी विविध मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसह बैठक आयोजित करून कामगार संघटनांची भूमिका जाणून घ्यावी असेही निर्देशित केले होते. त्यानुसार गुरुवार दि. 17 मार्च रोजी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व प्रशासन उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी चर्चा करून त्यांची भूमिका समजून घेतली होती.
त्या बैठकीतील चर्चेचा अहवाल जाणून घेत आयुक्तांनी 'समान काम - समान वेतन' याबाबत विविध कायदेशीर बाबींवर विस्तृत चर्चा केली. त्याचप्रमाणे इतर महानगरपालिकांमध्ये याविषयी सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.
या विषयाप्रमाणेच कोरोना प्रभावीत कालावधीत ज्या कंत्राटी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे अशा कामगारांच्या वारसांना रु. 5 लक्ष सानुग्रह अनुदान देणेबाबत त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच कोव्हीड विषयक काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही कोव्हीड भत्ता देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले.
सद्यस्थितीत कंत्राटदारामार्फत कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतनानुसार वेतन दिले जात असून 'समान काम - समान वेतन' या निकषानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली जात आहे. याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दाखवित महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष समिती स्थापन केली असून समितीच्या बैठकांतून या कामाला गतीमानता दिली जात आहे.
Published on : 22-03-2022 11:14:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update