*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, ज्ञान आणि समतेच्या विचारांना प्रेरणा देणारे स्मारक - डॉ.गणेश चंदनशिवे*
*बाबासाहेबांचे विचार घेऊन कार्यक्रमांच्या निमित्ताने जगभरात फिरत असताना देशापरदेशातील बाबासाहेबांच्या विविध प्रकारच्या स्मारकांना भेट देण्याचा योग आला. बाबासाहेबांच्या शिक्षण, ज्ञान व समतेच्या विचारांना महत्व देणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले स्मारक हे सर्व स्मारकांपेक्षा वेगळे असून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असल्याचे मत मुंबई विदयापीठाचे लोककला अकादमी विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले. स्मारकातील ग्रंथालयात असलेली विविध विषयांवरील ग्रंथसंपदा, बाबासाहेबांचा जीवनप्रवास प्रदर्शित करणारे छायाचित्रांचे भव्य दालन, मेडिटेशन सेंटर हे सगळेच भारावून टाकणारे असल्याचे मत त्यांनी स्मारकातील विविध सुविधांना भेट दिल्यानंतर मांडले. महानगरपालिका विविध लोककल्याणकारी योजना राबवून जपत असलेली सामाजिक बांधिलकी अनुकरणीय असल्याचे मत त्यांनी मांडले.*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवानिमित्त 30 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत आयोजित 'जागर 2022' कार्यक्रमात मुंबई विदयापीठाचे लोककला अकादमी विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी 'आंबेडकरी चळवळ आणि लोककला' या विषयावर सांगितीक व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी संत, पंत, तंत व शाहिरी काव्यपरंपरेचा आढावा घेत आपल्या सहका-यांसह लोकगीते सादर केली. महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर आणि मोठया संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी या माहितीपूर्ण व लोकसंगीतासह सादर झालेल्या व्याख्यानाला प्रचंड दाद दिली. स्मारकाबाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवरुनही शेकडो श्रोत्यांनी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.
*शाहिरांचे एक कवन हे माझ्या 10 भाषणांच्या तोडीचे असल्याचे मत बाबासाहेबांनी मांडले होते. हा लोककलावंत शाहिरांचा फार मोठा गौरव असल्याचे मत व्यक्त करीत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी समाजाला स्वाभिमान बाळगण्याची शिकवण देण्याप्रमाणेच शिक्षण हाच माणसाच्या प्रगतीचा मूलाधार आहे हे बाबासाहेबांचे विचार शाहिरांनी सर्वत्र नेले आणि त्यामुळेच सर्व स्तरांतील लोक बाबासाहेबांच्या विचारप्रर्वतक चळवळीकडे आकर्षित झाले असे सांगितले. बाबासाहेबांचे समानतावादी विचार लोककलावंतानी गावाखेडयातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचे फार मोठे काम केले असून लोककलावंत हेच बाबासाहेबांचे खरे पत्रकार होते अशा शब्दात परंपरेचा गौरव करीत अनेक कवने दमदार पहाडी आवाजात सादर करत त्यांनी सभागृह मंत्रमुग्ध करुन टाकले.*
महाराष्ट्र भूमी नेहमीच पुरोगामी विचारांची राहिली असून चक्रधरांसून पुढे संत परंपरेतही समता, बंधुता, ममता हाच विचार घेऊन कार्य होत राहिले. समाजोध्दारक महात्मा फुले यांना बाबासाहेब गुरुस्थानी मानत. तो समतेचा विचार बाबासाहेबांनी विश्वात्मक केला. हा विचार पुढे नेताना बाबासाहेबांना शाहिरी जलशाने हात दिला 1945 पर्यंत शाहिरी जलसे सुरू होते अशी माहिती देत या काळातील अनेक शाहिरी कवने लोककलेचा व आंबेडकरी चळवळीचा इतिहास कथन करताना डॉ गणेश चंदनशिवे यांनी सादर केली.
आंबेडकरी चळवळीतील लोककलावंतांची परंपरा कथन करीत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आजही अनेक शाहीर बाबासाहेबांच्या समतावादी विचार प्रसाराचे काम निष्ठेने करत आहेत असे अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले. *बाबासाहेबांचे विचार डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेतले पाहिजे असे सांगत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या वृत्तीतून आणि कृतीतून बाबासाहेब दिसले पाहिजेत असे मत मांडले.*
केवळ शाहिरांनीच नाही तर गावाकूसातल्या माताभगिनींनीही ओव्यांमधून बाबासाहेबांच्या प्रसार केल्याचे सांगत त्यांनी सुरेल आवाजात अनेक ओव्यांचेही गायन केले. संत जनाबाईंच्या नवसाच्या लोकगीताने कार्यक्रमात बहार आणत त्यांनी व्देष, भेदभाव, कर्मकांड, अनिष्ट रूढी यांना मूठमाती देत त्यामागील समतेच्या विचारांचा भावार्थ सांगितला.
जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकटे आली, न्याय व हक्कासाठी आंदोलने उभी राहिली तेव्हा तेव्हा लोककलावंतानी डफ, वादये हातात घेतली असून समाजात जोश निर्माण केला असे सांगत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सध्याची समाजाची वैचारिक स्थिती पहाता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
मुंबई विदयापीठातील त्यांचे सहकारी प्राथ्यापक डॉ.शिवाजी वाघमारे यांनी सादर केलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांच्या ज्ञातीधर्माच्या लावणीला तसेच त्यांचे विदयार्थी श्री. यशवंत जाधव यांनी सादर केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर व शिवरायांच्या दमदार आवाजातील पोवाडयालाही उपस्थित रसिकांची प्रचंड दाद मिळाली. गौरी चंदनशिवे या लहान मुलीची सहगायक म्हणून मंचावरील उपस्थिती विशेष लक्षवेधी होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबूक, युटयूब, इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांवरुनही जगभरातील नागरिकांनी या विशेष सांगितीक व्याख्यानाचा लाभ घेतला.
*14 एप्रिलपर्यंत 'जागर' उपक्रमांतर्गत विविध मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली असून श्रोत्यांसाठी ही वैचारिक मेजवानी आहे. मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी, सायं. 7 वाजता, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांचे 'भारतातील प्रबोधनाच्या चळवळी' या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान होणार असून नागरिकांनी याप्रसंगी सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब या स्मारकात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 05-04-2022 08:15:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update