*लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्व्हेक्षण कार्यवाहीला वेग – आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा* *सन 2023 –24 मधील मालमत्ताकर देयके लिडार सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त अद्ययावत माहितीच्या आधारे बनणार*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक लिडार तंत्रज्ञान वापरून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणाचे हे काम कालबध्द रितीने पूर्ण होण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्यामार्फत झालेल्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे.
सदर कामाची टप्पेनिहाय कालमर्यादा संबंधित एजन्सीला 3 फेब्रुवारीच्या आढावा बैठकीत सूचित करण्यात आलेली असून मागील अडीच महिन्यात झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड, नगररचनाकार श्री. सोमनाथ केकाण व संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञानाव्दारे दोन प्रकारे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या प्रकारचे प्रत्यक्ष जागी जाऊन केले जाणारे मोबाईल व्हॅन लिडार सर्व्हेक्षण अर्थात टेरिस्टल लिडार सर्व्हेक्षणाचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून 70 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.
त्याचप्रमाणे ड्रोनव्दारे आकाशातूनही सर्व्हेक्षण करण्यात येणार असून ड्रोनव्दारे सर्व्हेक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. आता स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असून ती प्राप्त होण्याकरिता अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्राधान्याने पाठपुरावा करून परवानगी जलद प्राप्त करून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
या बैठकीत आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी लिडार तंत्रज्ञानाव्दारे झालेल्या सर्व्हेक्षण कामाचा व नियोजित कामाचा सविस्तर आढावा घेऊन सन 2023 – 24 या कालावधीमधील मालमत्ताकर देयके या सर्व्हेक्षणाच्या आधारे प्रॉपर्टी सर्व्हे ॲनालिसीस प्रोजेक्टव्दारे करण्याचे निर्देश मालमत्ताकर विभागास दिले. याकरिता आवश्यक नकाशे तसेच बांधकाम परवानगी प्रमाणपत्र (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) याची माहिती जलद उपलब्ध करून देण्याचे नगररचना विभागास निर्देशित करण्यात आले.
मालमत्ताकर विभागाने इमारत / मालमत्ता सर्व्हेक्षणाकरिता लागणारे फॉर्म्स प्रमाणित करण्यास व सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त अहवाल तपासून सन 2023 – 24 या कालावधीतील मालमत्ताकर देयक या लिडार सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीला आधारभूत घेऊन करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी याप्रसंगी दिले.
लिडार तंत्रज्ञानाव्दारे टेरिस्टल सर्व्हे करताना सर्व जीआयएस डाटा अचूकपणे प्राप्त होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 12 ठिकाणी बेस स्टेशन मार्कींग करीत ग्राऊंड कंट्रोल पॉईंट (GCP) बसविण्यात येत असून 7 ठिकाणची कामे पूर्ण झाली असून 5 ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. याव्देर मोबाईल लिडर व ड्रोन सर्व्हेव्दारे प्राप्त इमेजेस यांच्या जिओ रेफरन्सकरिता उपयोग होऊन सर्व जीआयएस डाटा अचूकपणे प्राप्त होणार आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस मॅपींग) आधारित लिडार तंत्रज्ञानाव्दारे 360 डिग्रीमध्ये विस्तीर्ण सर्व्हेक्षण करण्यात येत असून यामधून वाढत्या नागरिकीकरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांबाबतची पूर्ण व अचूक माहिती महानगरपालिकेस उपलब्ध होऊन सर्व मालमत्ता या मालमत्ता कराच्या कक्षेत येतील व मालमत्ता कराव्दारे महानगरपालिकेस मिळणा-या उत्पन्नात वाढ होणार आहे.
याशिवाय महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्ता तसेच शहरातील जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या, पथदिवे, विविध नागरी सुविधा यांची माहितीही अद्ययावत होणार आहे. यामुळे महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकास नियोजनाकरिता ही माहिती लाभदायी होणार आहे.
लिडार सर्व्हेक्षणाच्या कामाचे महत्व लक्षात घेत ते कालमर्यादित स्वरूपात होण्याकरिता महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर होत असलेल्या कामाची व त्यामधील प्रत्येक बाबीची बारकाईने माहिती जाणून घेत आहेत. या आढावा बैठकीतही आयुक्तांनी लिडार तंत्रज्ञानाव्दारे होणारे मालमत्ता सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण क्षमतेने व निश्चित केलेल्या कालावधीत गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
Published on : 27-04-2022 14:41:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update