*इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन्स कामांचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला सविस्तर आढावा*
*पर्यावरणशील शहराच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रिकल वाहने वापरासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रोत्साहन दिले जात असून यादृष्टीने इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशनची सुविधा महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे. या अनुषंगाने इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन उभारणेबाबतच्या कार्यवाहीचा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत सविस्तर आढावा घेतला. चार्जींग स्टेशनचे काम एक झाल्यावर दुसरे अशाप्रकारे सुरु न करता जास्तीत जास्त चार्जींग स्टेशनची कामे एकाच वेळी समांतररित्या सुरु करावीत जेणेकरून कमी कालावधीत विविध ठिकाणच्या चार्जींग स्टेशनची कामे पूर्ण होऊन ती वापरात येतील असे निर्देश त्यांनी दिले.*
सद्यस्थितीत चार्जींग स्टेशन उभारण्याकरिता 20 जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी त्वरित काम सुरु करण्यात येऊ शकेल अशा 18 जागांबाबत या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. सदर 18 जागांची महानगरपालिका अभियंता आणि पॉवरग्रीडचे प्रतिनिधी यांनी पुढील 2 दिवसात संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
पाहणीअंती इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन स्थळांची प्राधान्यक्रम यादी तयार करावी व त्यानुसार समांतर कामे सुरु करावीत असे आयुक्तांनी सूचित केले.
पॉवरग्रीड कंपनीने काम सुरु करण्यापूर्वी इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन संबंधित प्रत्येक बाबीची स्थळनिहाय कालमर्यादा निश्चित करावी व तेथील चार्जींग स्टेशनसाठी आवश्यक उपकरणे व साहित्य यांची उपलब्धता करून घेणे, स्थापत्य कामे करणे, इलेक्ट्रिकल उपकरणे बसविणे अशा सर्व गोष्टींची टप्पेनिहाय आखणी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
स्लो चार्जींग व फास्ट चार्जींग यासाठी प्रत्येक वाहनाला लागणारा वेळ याची माहिती घेऊन चार्जींग स्टेशनवर आलेल्या नागरिकांना चार्जींग होईपर्यंत विरंगुळ्यासाठी उत्तम दर्जाच्या कॅफेटेरियाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशाप्रकारे चार्जींग स्टेशनच्या आकर्षक रचनेकडे व तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले.
इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशनच्या वीजपुरवठ्याबाबत एमएसईडीसीएल यांचे अधिक्षक अभियंता यांच्याशी आयुक्तांनी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून त्यांस सदर पर्यावरणपूरक बाबीचे महत्व जाणून घेत लवकरात लवकर वीजपुरवठा मिळणेबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले. तसेच एनएमएमटी अभियंत्यांनी संबंधित एम.एस.ई.डी.सी.एल. अभियंत्यांशी चर्चा करून प्रत्येक स्थळनिहाय असलेली आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी व त्याबाबतची कार्यवाही चार्जींग स्टेशन उभारण्याची कार्यवाही सुरू असताना समांतरपणे करावी, जेणेकरून सर्व कामे वेळेत होतील असेही आयुक्तांनी सूचित केले.
*पॉवरग्रीड कंपनीमार्फत होणारे चार्जींग स्टेशन उभारणीचे हे काम वेगळ्या स्वरुपाचे असून नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच पॉवरग्रीडचेही नाव यामुळे होणार आहे असे स्पष्ट करीत त्या दर्जाचे काम करावे व त्याठिकाणी इलेक्ट्रीकल चार्जींग प्रमाणेच कॅफेटेरिया, प्रसाधनगृह व इतर सुविधा त्या दर्जाच्या उपलब्ध करून द्याव्यात असे आयुक्तांनी निर्देशित केले.*
*हे काम विहित वेळेत होणे गरजेचे आहे याचे महत्व लक्षात घेऊन नमुंमपा परिवहन उपक्रमाने या कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी विशेष अभियंत्याची नेमणूक करावी असे सूचित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दर महिन्याला या कामाचा स्वत: आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.*
याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, यांत्रिकी उप अभियंता श्री. विवेक अचलकर आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Published on : 10-05-2022 11:14:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update