*कोव्हीड लसीकरणाला गती देण्यासाठी 31 मे पर्यंत ‘विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहीम’*
कोव्हीड लसीकरणाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच सुयोग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारे नवी मुंबई हे पहिले शहर होते. तसेच दोन्ही डोसचे 100 टक्के प्रमाणही नवी मुंबई महानगरपालिकेनेच प्रथमत: पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे 15 ते 17 वर्ष आणि 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही नवी मुंबई महानगरपालिका इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे.
तथापि सदयास्थितीत कोव्हीडचा प्रभाव कमी झाल्यामुळे दुसरा डोस घेण्याची अथवा तिसरा प्रिकॉशन डोस घेण्याची विहित वेळ होऊनही लसीकरण करून घेण्याकरिता नागरिक फारसे पुढे येताना दिसत नाहीत असे चित्र आहे. मात्र पुरेशा प्रमाणात लसीकरण झाल्यामुळेच तिस-या लाटेचा प्रभाव तितकासा जाणवलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लसीकरणाचे महत्व लक्षात घेऊन तसेच जगातील इतर देशांतील विद्यमान कोव्हीड स्थिती लक्षात घेता चौथ्या लाटेचा संभाव्य धोका नजरेसमोर ठेऊन कोव्हीड लसीकरणाचे दोन्ही डोस आणि निश्चित केलेल्या वयोगटांनी प्रिकॉशन डोस घेणे गरजेचे आहे.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमातून प्रयत्न करत असून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका आयूक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 12 मे ते 31 मे या कालावधीत ‘विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहीम’ हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमे अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात दररोज किमान दोन ठिकाणी लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता 750 ठिकाणी निश्चित करण्यात आली असून यामध्ये नाके, मार्केट, बाजार, रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल, रहिवाशी संघ अशा नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात अशा वर्दळीच्या ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या एनएनएमटी बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या मोहीमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील शिक्षकांचा महत्वाचा सहभाग असणार असून प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 7 शिक्षक व 3 मदतनीस असे समूह तयार करण्यात आले आहेत. या समुहांमार्फत नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरातील नागरिकांपर्यंत पोहचून लसीकरणाचा दुसरा डोस अथवा प्रिकॉशन डोस न घेतलेल्या तसेच 12 वर्षावरील लसीकरण न झालेल्या मुलांचे लसीकरण करून घेण्याकरिता जनजागृती, प्रबोधन व पुढाकार घेतला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 18 वर्षावरील 12,54,436 नागरिकांनी कोव्हीडचा पहिला डोस घेतला असून 11,31,341 नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत तसेच 57,332 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.
त्याचप्रमाणे 15 ते18 वर्ष वयोगटातील 80,581 कुमार व युवकांनी कोव्हीडचा पहिला डोस घेतला असून 63,751 जणांनी कोव्हीडचा दुसराही डोस घेतला आहे.
याशिवाय 12 ते14 वर्ष वयोगटातील मुलांना कोबिव्हॅक्स लस दिली जात असून 38,731 मुलांनी पहिला डोस व 26,751 मुलांनी दोन्ही डोस घेतलेले आहे.
कोव्हीड 19 लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून 12 ते 31 मे या कालावधीत राबविण्यात जाणा-या विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहीमेव्दारे लसीकरणाला गतीमानता देण्यात येत आहे व लसीकरणाव्दारे जास्तीत जास्त नागरिक कोव्हीड लस संरक्षित व्हावेत याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी नवी मुंबई नागरिकांनी व मुलांनी आपल्या लसीकरणाच्या विहित कालावधीत लसीकरण करून घ्यावे असे आव्हान महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी केलेले आहे.
Published on : 13-05-2022 16:43:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update