*दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिक्षा यादीमधील अर्जदारांना* *हरकती / सूचना दाखल करण्यासाठी 17 जूनपर्यंत मुदत*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिकेने दिव्यांगांकडून दि. 11 फेब्रुवारी 2019 व 06 जून 2019 रोजी वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविले होते. त्यास अनुसरून एकूण 714 अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहेत.
या अर्जदारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली असून ही यादी अंतिम करण्याकरिता प्रतिक्षा यादीमधील अर्जदारांकडून 03 जून 2022 पासून 17 जून 2022 रोजी, सायं 5.00 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.
ज्या दिव्यांगांनी 11 फेब्रुवारी 2019 व 06 जून 2019 रोजीच्या वृत्तपत्र जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने व विहित वेळेत महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाकडे अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनाच हरकती / सूचना नोंदविता येतील. या हरकती /सूचना नोंदविताना त्याला पूरक अशी प्रमाणित विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.
जे अर्जदार स्वतः शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, सिडको, एम.आय.डी.सी. इत्यादी सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये नियमित / करार / ठोक पगारावर सेवेत असतील अथवा, ज्यांनी वरील प्राधिकरणांकडून यापूर्वी व्यावसायिक जागा उपलब्ध करून घेतलेली आहे, अथवा ज्या अर्जदारांना अन्य कुठलेही उत्पन्नाचे स्त्रोत असेल असे अर्जदार या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत.
ज्या अर्जदारांनी अर्जात केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पत्ता नमूद केलेला आहे, मात्र त्याबाबत पुरावा सादर केलेला नाही अशी नावे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील अर्जदारांच्या यादीत समाविष्ट आहेत. सदर यादीतील अर्जदारांनी हरकत / सूचना नोंदविताना महानगरपालिका क्षेत्रात राहत असल्यास तसा पुरावा सादर करावा असे सूचित करण्यात येत आहे.
अर्जदारांची प्रतिक्षा यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन बघण्यासाठी तसेच मालमत्ता विभाग, नमुंमपा मुख्यालय त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेची आठही विभाग कार्यालये याठिकाणी बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
अर्जदारांनी आपल्या हरकती / सूचना लेखी स्वरूपात उपआयुक्त (मालमत्ता), मालमत्ता विभाग, तळमजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट क्र. 01, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614 यांच्याकडे 17 जून 2022 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत पोहचतील अशाप्रकारे सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष अथवा पोस्टाव्दारे वा कुरिअरव्दारे प्राप्त होणा-या हरकती व सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी असे नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ता विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
Published on : 03-06-2022 14:30:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update