*इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधीतील अद्ययावत वाहनाव्दारे सफाईमित्र सुरक्ष चॅलेंज अभियानाला सक्षमता*




नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. या कंपनीकडून सीएसआर उपक्रमांतर्गत जेटींग, रॉडींग व ग्रॅबींगची एकत्र सुविधा असलेले वाहन उपलब्ध झाले आहे. मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत या अद्ययावत वाहनाचे हस्तांतरण नवी मुंबई महानगरपालिका वाहन विभागाकडे करण्यात आले आहे. या वाहनासोबत कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कन्फाईंड स्पेस एन्ट्री किट, ट्रायपॉड, एअर व्हेंटिलेशन फॅन, एअर ब्रेथींग ॲपॅरेटस, ऑक्सिजन सिलींडर, मल्टिगॅस डिटेक्टर, हेल्मेट विथ टॉर्च, रोप लॅडर अशी अत्याधुनिक सुरक्षा साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हे वाहन हलक्या व्यावसायिक प्रकारच्या चेसीसवर (LCV) बांधणी करण्यात आलेले असल्याने नमुंमपा क्षेत्रातील लहान तसेच अरुंद गल्ली व रस्ते या ठिकाणी असलेल्या मल:निस्सारण वाहिन्या सफाईसाठी या वाहनाचा प्रभावीपणे वापर करता येईल. वाहनावर जेटींग, रॉडींग व ग्रॅबींग या तीन सुविधा एकत्र उपलब्ध असल्याने मलनि:स्सारण साफसफाईच्या कामासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या वाहनांवरील जेटींग पंपाच्या सहाय्याने मलनि:स्सारण वाहिन्या डि चोक, डि स्लिट आणि स्वच्छ करता येतील. या वाहनामध्ये ट्रॉलीवर बसविलेले रॉडींग मशिन उपलब्ध करुन दिलेले असून या मशीनच्या सहाय्याने मलनि:स्सारण वाहिन्यांमधील अडकलेला व साठून राहिलेला प्लास्टीक, पेपर, झाडाची वाळलेली पाने, मुळे, विटा तसेच इतर प्रकारचा कचरा साफ करता येईल.
या वाहनावर ग्रॅबींग सुविधा उपलब्ध करुन दिलेली असून त्याच्या सहाय्याने मलनि:स्सारण वाहिन्यांच्या मशीनहोल मधील 20 फूटापर्यंतचा साचलेला गाळ व कचरा बकेटच्या सहाय्याने बाहेर काढून वाहनावर बसविलेल्या हॉप्पर ट्रे मध्ये जमा केला जाऊ शकतो व नंतर त्याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. मलनि:स्सारण वाहिन्यांची मानवी संपर्कविरहीत साफसफाई व मशीनहोल मधील साचलेला गाळ काढण्यासाठी सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानामध्ये या मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर करता येणार आहे.
Published on : 03-06-2022 14:35:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update