*नवी मुंबईतील चित्रकविताभिंतींची कवीवर्य अशोक नायगांवकर यांच्याकडून प्रशंसा*

शारीरिक आरोग्य जपणूकीप्रमाणेच मानसिक आरोग्याची जपणूकही तितकीच महत्वाची असून नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहरात पंन्नासहून अधिक ठिकाणी मराठीतील नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांचे चित्ररूप दर्शन घडविणा-या चित्रभिंती उभ्या केल्या आहेत हीच अतिशय आगळीवेगळी गोष्ट असून त्याबद्दल महानगरपालिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे अशा शब्दात सुप्रसिध्द कवी श्री. अशोक नायगांवकर यांनी दिलखुलास अभिप्राय दिला.
17 डिसेंबर 2021 रोजी स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मराठीतील नामंवत कवींच्या स्वच्छ कवी संमेलनात श्री. अशोक नायगांवकर यांनी नवी मुंबईसारख्या एखाद्या शहरात मराठी भाषेचे वैभव दर्शविणा-या कवितांच्या ओळी ठिकठिकाणी प्रदर्शित केल्या जाव्यात अशी सूचना कविता सादर करताना केली होती.
या सूचनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहर सुशोभिकरणात विविध संकल्पना राबविल्या जात असताना शहरातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, रस्त्यांवरील दर्शनी जागा येथे मराठीतील नामवंत कवींच्या ओळी पूरक चित्रांसह साकारण्याची आखणी केली. यासाठी नामांकित कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळींची निवड करण्यात आली. सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी सुलेखनातून त्या कवितांमधील भावार्थाला अक्षऱ आकार दिला. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, रचना संसद, रहेजा आर्ट स्कूल येथील विद्यार्थी कलाकारांनी तसेच स्थानिक उत्तम चित्रकारांनी त्या कवितांच्या ओळींना अनुरूप चित्रे काढून नवी मुंबई ठिकठिकाणी कवितांच्या चित्रभिंती सजविल्या.
त्या चित्रभिंतींची आज सुप्रसिध्द कवी श्री. अशोक नायगांवकर यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली व अशाप्रकारची वेगळी सूचना केल्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या अवधीत इतक्या सुंदर आणि अप्रतिम रितीने कविता संकल्पना साकारल्याबद्दल आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि संबंधितांचे कौतुक केले.
समाजाचा विचार करणारे हे सर्व कवी म्हणजे आधुनिक ऋषीमुनीच आहेत असे मत व्यक्त करीत श्री. अशोक नायगांवकर यांनी मराठी भाषेचे ऐश्वर्य दाखविणारा चित्रभिंतींचा हा सुंदर प्रयोग असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरांपासून आधुनिक कवितेपर्यंत 700 वर्षांचा हा कवितेचा इतिहास नवी मुंबईतल्या चौका-चौकात जागविल्याबद्दल आनंद व्यक्त करीत भारतातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा दौरा करावा, येथे सहली काढाव्यात व त्यांचेही शहर येथून प्रेरणा घेऊन नटवावे अशी सूचना करीत श्री. अशोक नायगांवकर यांनी शहरात येता-जाता या कवितांच्या ओळी नजरेस पडल्यानंतर नागरिकांचे सांस्कृतिक पोषण होईल असा विश्वास व्यक्त केला.
शहर सुशोभिकरणाचा एक भाग असलेल्या या चित्रभिंतींच्या वेगळेपणाची नोंद नवी मुंबईतील नागरिकांप्रमाणेच शहरातून प्रवास करणारे व शहराला भेट देणारे प्रवासी आणि पर्यटक यांच्याकडूनही घेतली जात असून या अभिनव संकल्पनेची विविध स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.
कवी श्री. अशोक नायगांवकर यांनीही चित्राच्या माध्यमातून दृष्टीला, मनाला आल्हाददायक वाटते, मात्र शब्द, कविता या माध्यमातून माणसाचे माणसाशी असलेले नाते कसे असायला हवे हे समजते. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने चित्रकविता भिंतींचा व्यापक प्रमाणात राबविलेला हा उपक्रम दाद देण्यासारखा असून अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिघ्यापासून बेलापूरपर्यंत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, केशवसुत, गोविंदाग्रज, कवी यशवंत, बा.सी. मर्ढेकर, बालकवी, साने गुरुजी, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, सुरेश भट, ग्रेस, नारायण सुर्वे, इंदिरा संत, बहिणाबाई, शांता शेळके, ग.दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर, नामदेव ढसाळ अशा अनेक नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळी 52 ठिकाणी चित्रांकित करण्यात आलेल्या आहेत. या चित्रकविताभिंतींच्यां माध्यमातून नवी मुंबई शहर कवितांचे शहर म्हणून नावाजले जात आहे याचा सार्थ आनंद कविवर्य अशोक नायगांवकर यांनी व्यक्त केला.
Published on : 10-06-2022 14:40:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update