*रुग्णालयीन सुविधा उपलब्धतेत नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी नियोजनाच्या आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या सूचना*

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाना नोंदणी, तपासणी, आवश्यकतेनुसार एक्सरे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन अशा चाचण्या करणे तसेच औषधे घेणे या प्रक्रियेसाठी कमीत कमी प्रतिक्षा कालावधी असावा व नागरिकांचा वेळ वाचावा यादृष्टीने आवश्यक बदल करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी रुग्णालय भेटीप्रसंगी दिले.
आयुक्तांनी आज सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे अचानक भेट देत केस पेपर नोंदणी कक्षांसह इतर सर्व सुविधांची बारकाईने पाहणी केली. केस पेपर नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच दिव्यांग व गरोदर महिला यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणेबाबत नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांन याप्रसंगी दिल्या.
रुग्णालयात सद्यस्थितीत खाजगी संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या दरात सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध करून घेण्यात आलेली आहे. सध्या याप्रकारे सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जात असून या नव्याने सुरू व्यवस्थेची आयुक्तांनी पाहणी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुविधेत सीटी स्कॅन कॉन्ट्रॅस्ट लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने साधनसामुग्री घेऊन नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सिटी स्कॅन सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांना व्हावा याकरिता पूर्ण क्षमतेने यंत्रणेचा वापर करावा असेही आयुक्तांनी सूचित केले. खाजगी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या सुविधेपेक्षा नागरिकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारी सिटी स्कॅन सुविधा अधिक सक्षम करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.
अशाच प्रकारे एक्सरे कक्ष, सोनोग्राफी कक्ष, ईसीजी कक्ष अशा सर्व चाचण्यांच्या कक्षांना भेटी देऊन प्रतिदिन किती चाचण्या होतात याचा आढावा घेताना नागरिकांना चाचण्यांसाठी किती वेळ वाट पहावी लागते याचाही तपशील प्रत्येक चाचणी कक्षात आयुक्तांनी जाणून घेतला. सोनोग्राफी कक्षाबाहेर गरोदर महिलांना जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे औषध वितरण कक्षाला भेट देत आयुक्तांनी औषध वितरण प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. औषधे घेण्यासाठी नागरिकांना फार वेळ रांग लावावी लागू नये यादृष्टीने दैनंदिन आढावा घेऊन आवश्यकतेनुसार औषध वितरण खिडक्यांमध्ये वाढ करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी रुग्णालय मध्यवर्ती व सर्वांना सोयीचे असल्याने या रुग्णालयावर रुग्णसेवेचा सर्वाधिक भार असतो. त्यामुळे येथील कार्यप्रणालीचे सुव्यवस्थित नियोजन करून रुग्णांचा कमीत कमी वेळ सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेत जावा या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयाकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बारकाईने लक्ष दिले असून महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणा-या विविध चाचण्यांच्या सुविधाही अधिक गुणवत्तापूर्ण रितीने व सुलभ रितीने दिल्या जाव्यात याबाबतही रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना निर्देश दिले.
Published on : 20-07-2022 14:27:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update