*नमुंमपा शाळांतील चित्रकलेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता अभिनव योजना*
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमासोबतच त्यांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे त्यांच्यामधील सुप्त कला-क्रीडा गुण प्रदर्शित करण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येत असते.
यादृष्टीने जिल्हा स्तरावर गुणवत्ता सिध्द करणा-या महापालिका शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांकरिता विशेष योजना राबविण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची मान्यता प्राप्त झालेली आहे.
अशाच प्रकारे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहनपर योजनेस आयुक्तांची मंजूरी प्राप्त झालेली आहे. विविध कलांमध्ये चित्रकला ही कल्पनाशक्तीला मुक्त वाव देणारी व विद्यार्थ्यांना प्रिय असणारी कला असून अनेक विद्यार्थी चित्रकलेमध्ये प्राविण्य मिळविताना दिसतात.
अशा चित्रकलेत रस असणा-या व गुणवत्ता प्रदर्शित करणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात चांगले प्रशिक्षण घेऊन उत्तम कामगिरी करण्यासाठी विद्यार्थी कल्याणकारी योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शालेय स्तरावर चित्रकलेत एलिमेंटरी तसेच इंटरमिजीएट अशा दोन परीक्षा असतात. या चित्रकला स्पर्धा परीक्षांत ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांकरिता प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत चित्रकला प्रशिक्षण उपलब्ध करून घेण्याकरिता प्रति वर्ष रु.6000/- अशाप्रकारे 3 वर्षे प्रशिक्षण शुल्क देणे. त्याचप्रमाणे चित्रकला साहित्याकरिता प्रति वर्ष रु.5000/- याप्रमाणे 3 वर्षाकरिता चित्रकला साहित्य खरेदी करिता रक्कम उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या अभिनव योजनेला आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मान्यता दिलेली आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या व्यापक संधी नव्या पिढीसमोर उपलब्ध आहेत. त्यामुळे महानगरपालिका शाळांमध्ये शिकणारी विविध कला-क्रीडा गुण असणारी मुले केवळ त्यांच्या कौटुंबिक अडचणींमुळे मागे पडू नयेत व त्यांच्या अंगभूत गुणांना विस्तारित व्यासपीठ मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्न करीत असून महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणा-या विविध योजना हा त्याचाच एक भाग असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यामधून नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविणारे कलावंत व खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
Published on : 08-08-2022 13:10:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update