*नवी मुंबईकरांनी सक्रिय सहभागी होत यशस्वी केला 'समूह राष्ट्रगीत गायन' उपक्रम*
*नवी मुंबई महानगरपालिका* प्रसिध्दीकरिता दि. 17 / 08 / 2022 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत आज महापालिका मुख्यालयात सकाळी 11.00 ते 11.01 या वेळेत समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम ॲम्फिथिएटर येथे समस्त महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजच्या वेबसंवादात उपस्थिती अनिवार्य असल्याने त्यांनी मुख्यालयातील विशेष समिती कक्षात वेबसंवाद सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी यांचेसह समूह राष्ट्रगीत गायन केले. अशाच प्रकारे महानगरपालिकेची मुख्यालयाव्यतिरिक्त असलेली सर्व कार्यालये, 8 विभाग कार्यालये, रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, ग्रंथालये, अग्निशमन केंद्रे अशा सर्वच कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारीवृंदाने समूह राष्ट्रगीत गायन केले. नमुंमपा शिक्षण विभागाने सूचित केल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्येही हा राष्ट्रगीत गायन उपक्रम उत्फुर्तपणे संपन्न झाला. महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांसह समूह राष्ट्रगीत गायन केले तसेच विशेष म्हणजे कर्णबधीर विभागातील विद्यार्थी, शिक्षकांनी खुणेच्या भाषेत (साईन लँग्वेज) राष्ट्रगीत सादर केले. आयुक्तांनी केलेल्या आवाहनास अनुसरून शहरातील विविध संस्था, आस्थापना तसेच व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनीही सकाळी 11.00 ते 11.01 या वेळेत राष्ट्रगीत गायन करून हा अभिनव उपक्रम यशस्वी केला व राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले
Published on : 17-08-2022 10:58:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update