*जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आरोग्य विभागाची जनजागृती*
नवजात बालकाला सुरुवातीपासूनच स्तनपान करविणे हे त्याच्यासाठी एक नैसर्गिक वरदानच नव्हे तर ते जीवनामृत आहे. त्यामुळे पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध देणे गरजेचे असते. ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.
पूर्ण स्तनपान केलेली बालके शारीरिक व बौद्धिकदृष्टया तंदुरुस्त असतात. स्तनपानामुळे बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते हे लक्षात घेऊन बाळाच्या जन्मानंतर मातेचे दूध हे परिपूर्ण अन्न आहे. ते आरोग्यवर्धक, निर्मळ तसेच पचण्यास सोपे असते. वेगवेगळया जंतुसंसर्गापासून मधुमेहापर्यंत आणि डायरियापासून निरनिराळया ॲलर्जीपर्यंत अनेकविध आजारांचा धोका स्तनपानामुळे घटतो.
पोषकतत्व तसेच रोगप्रतिकारक्षमता आणि पचविण्यासाठी सोपे आणि दुधातून पुरेसे पाणीसुद्धा मिळते, अशा सर्व गुणधर्मामुळे सहा महिने आईचे दूध गरचेचे असते. बाळ व आई एकत्र असताना, ते प्रवासात व घराबाहेर कोठेही बाळाला सहज उपलब्ध होते. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, रुग्णालये असा सार्वजनिक ठिकाणी मातेस स्तनपान करता यावे यासाठी शासानाने “हिरकणी कक्ष” या नावाने स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे स्तनपानाचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक मातेने आपल्या सुदृढ व सक्षम बालकाच्या विकासासाठी त्याला आवर्जून स्तनपान करावे असे नामांकित आरोग्य तज्ज्ञांकडून सूचित करण्यात येत असते.
स्तनपान करणाऱ्या मातेने स्वत:ची अधिक काळजी घेण्याची गरज असून जास्त उष्मांक, प्रथिने, जीवनसत्वांची आवश्यकता लक्षात घेऊन प्रसुतीनंतर पौष्टिक हलका आहार घ्यावा. पातळ पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळांचा रस यांचा जेवणात समावेश करावा. तसेच बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत आईने लोहयुक्त गोळया व कॅल्शियम गोळया घ्याव्यात अशा सूचना आरोग्य विभागाच्या वतीने मातांना दिल्या जात आहेत.
बाळाला स्तनपान केल्याने मातेचे नैसर्गिक आरोग्य चांगले राहत असल्याचे नामांकित डॉक्टरांचे म्हणणे असून स्तनपानामुळे माता आणि बाळ दोघेही सुदृढ तसेच निरोगी राहतात. परंतू सध्या फॅशनपोटी अनेक माता नवजात बाळाला वरचे म्हणजे गाय किंवा म्हशीचे दूध देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बाळाला आवश्यक असलेले हलके आणि पौष्टिक अन्न मिळत नाही व अशा बालकांमध्ये कुपोषण होण्याचा धोका अधिक वाढतो हे स्तनपान करणा-या मातांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
बाळाला ताप, सर्दी, खोकला, उलटी अथवा जुलाब असला तरी आईने स्तनपान सुरू ठेवावे. यामुळे बाळामध्ये प्रतिकारशक्ती वाढते व आजार बरे होण्यास मदत होते. बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते. दुधातून बाळाला आधिक प्रमाणात लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी मिळते. त्यामुळे त्याची तहानही भागते.
स्तनपानामुळे बाळंतपणानंतर रक्तस्त्राव कमी होतो. पाळणा लांबविण्यास मदत होते तसेच स्तनांच्या आणि बीजकोशांच्या कर्करोगाचे प्रमाणही कमी होते. मातेचा बांधा पूर्ववत होण्यास मदत होते. अशा सर्व बाबींमुळे स्तनपान आईच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते हे मातांना सांगितले जात आहे.
स्तनपानाचे महत्व जागतिक स्तरावरील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले असून बालकांना जन्मल्याबरोबर जंतू संसर्गाना सामोरे जावे लागते. त्यावर आळा घालण्यासाठी बाळ जन्मल्यावर शक्य होईल तितक्या लवकर म्हणजेच अर्ध्या तासाच्या आत मातेने बाळास स्तनपान दिल्यास कोलेस्ट्रमयुक्त दूध बालकास मिळते. त्यामुळे बालकाची रोगप्रतिकारशक्ती व्दिगुणीत होते. बाळाला स्तनपान देण्यास काही अडचण असेल तर मातेने प्रशिक्षित आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन सल्ला घ्यावा तसेच घरातील जवळच्या व्यक्तीही अशा मातेस मदत करू शकतात.
त्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यातील जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त प्रत्येक मातेने आपल्या बाळाच्या आऱोग्याची काळजी घेत स्तनपानाचे महत्व लक्षात घेऊन सुरुवातीचे सहा महिने निव्वळ स्तनपान दयावे तसेच बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत पूरक आहारासोबत स्तनपान देखील सुरू ठेवावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-08-2022 15:27:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update