श्रीगणेशोत्सव व्यवस्थेची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कोरोना प्रभावित कालावधीनंतर 2 वर्षानी निर्बंधामध्ये काहिशी शिथिलता आलेली असताना श्रीगणेशोत्सवास उदया दिनांक 31 ऑगस्टपासून सुरुवात होत असून नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्सव व्यवस्थित पध्दतीने साजरा व्हावा याकरिता दक्षतेने कार्यरत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त् श्री. अभिजीत बांगर यांनी नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापालिका अधिकारी, कर्मचारी यांस दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून त्यादृष्टीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच नैसर्गिक जलाशयांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बेलापूर ते दिघा अशा आठ विभाग कार्यालय क्षेत्रात 134 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम विसर्जन तलाव बनविण्यात आले असून त्यापैकी काही कृत्रिम तलावांची तसेच नैसर्गिक विसर्जन तलावांची पाहणी आयुक्तांनी केली.
कृत्रिम व नैसर्गिक विसर्जन तलावांच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात असे सूचित करतानाच आयुक्तांनी पारंपारिक नैसर्गिक 22 विसर्जन तलावांजवळ जागा असेल त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारुन नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात आणून देऊन कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्रोत्साहित करावे अशा सूचना केल्या. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने आपापलया क्षेत्रातील पर्यावरणविषयक जागरूक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व त्यांचे स्वयंसेवक आणि आपले कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनस्थळी उपस्थित राहून विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना कृत्रिम तलावात विसर्जन करावे अशी विनंती करतील अशा प्रकारे व्यवस्था करण्याचे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व तलावांच्या जलाशयातील पालापाचोळयाची नियमित सफाई केली जाते, ती गणेशोत्सव कालावधीत अधिक काटेकोरपणे करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. श्रीमूर्तींसोबत येणारे हार, फुले असे ओले निर्माल्य तसेच कंठी, मुकुट, कृत्रिम माळा, सजावट साहित्य असे सुके निर्माल्य विसर्जनस्थळी ठेवल्या जाणाऱ्या वेगवेगळया निर्माल्य कलशात टाकले जाईल याकडेही लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत जलाशयात निर्माल्य टाकले जाणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
विसर्जन स्थळांवर एकाचवेळी जास्त् गर्दी होऊ नये याचे पोलीस विभागाशी समन्वय साधून पूर्वनियोजन करावे असे परिमंडळ उपायुक्त व विभाग अधिकारी यांना सूचित करतानाच सर्व नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी पुरेशी विदयुत व्यवस्था करण्याचे त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते अशा नैसर्गिक विसर्जन स्थळी सीसीटीव्ही यंत्रणा नियमित सुरु राहील याकडेही विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.
सर्व विसर्जन स्थळांवर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यासह सुरक्षा रक्षक, अग्निशमन जवान, आरोग्य यंत्रणा यांनाही परस्पर समन्वय राखून संबंधित विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दक्षतेने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
श्रीगणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास जलद कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दुरूस्ती कार्यवाही करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त गणेशोत्सव कालावधीत रस्त्यांविषयी कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास त्याठिकाणी त्वरीत दुरुस्ती कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
या विसर्जनस्थळे पाहणी प्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुकत् श्री. दादासाहेब चाबुकस्वार, अतिरिक्त् शहर अभियंता श्री. मनोज पाटील, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये व श्री. सुनिल लाड उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे संपन्न् व्हावा यादृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली असून पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त् श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-08-2022 15:26:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update