राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळेतील स्वहम पात्रा जिल्ह्यात सर्वप्रथम नमुंमपा शाळांतील 131 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झळकत उंचविला शिक्षण व्हिजनचा नावलौकीक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत मानांकित झाले आहेत.
यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 91, दिवा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी स्वहम पितांबर पात्रा या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनचा नावलौकीक उंचाविला आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 33 शाळांमधील इयत्ता 8 वीतील 582 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल 131 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले असून त्यांना दरमहा रु. 1 हजार याप्रमाणे वर्षाला रु. 12 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळाणार आहे. ही शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता 12 वी पर्यंत या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
याशिवाय महानगरपालिका शाळांतील गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला आर्थिक बळ मिळावे यादृष्टीने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणा-या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रति महिना रु.600/- इतका आर्थिक लाभ या शैक्षणिक वर्षापासून देण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार या 131 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
इयत्ता 8 वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला आर्थिक कारणांमुळे अडचणी येऊ नयेत यादृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जात असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने शिष्यृत्ती प्राप्त विद्यार्थी स्वहम पात्रा व इतर सर्व गुणवत्ता यादीत मानांकन मिळविणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Published on : 01-09-2022 13:57:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update