दीड दिवसांच्या विसर्जन सोहळयात 9077 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप

*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्रीगणरायाच्या 9077 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या चोख विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा नियोजनबध्द रितीने पार पडला.*
*नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर 6555 घरगुती व 11 सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या 6566 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले.* यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1701 घरगुती व 3 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 912 घरगुती व 4 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 671 घरगुती, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 396 घरगुती व 3 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 814 घरगुती, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 1060 घरगुती व 1 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 832 घरगुती, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 169 घरगुती अशा एकूण 6555 घरगुती व 11 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 6566 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
यावर्षी कोव्हीड निर्बंधांमध्ये काहीशी शिथीलता असल्याने गणेश भक्तांचा उत्साह पाहता विसर्जनस्थळांवर गर्दी होऊ नये यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर 134 कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या *134 कृत्रिम विसर्जन स्थळांना नागरिकांचा अतिशय उतम प्रतिसाद लाभला. या कृत्रिम तलावात 2499 घरगुती व 12 सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण 2511 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले* यामध्ये - बेलापूर विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 321 घरगुती व 4 सार्वजनिक, नेरूळ विभागात – 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 361 घरगुती, वाशी विभागात –16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 399 घरगुती, तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 381 घरगुती व 6 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 385 घरगुती, घणसोली विभागात - 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 206 घरगुती, ऐरोली विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 357 घरगुती व 2 सार्वजनिक व दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 89 घरगुती अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2499 घरगुती व 12 सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण 2511 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
*अशाप्रकारे दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी 9054 घरगुती व 23 सार्वजनिक अशा एकूण 9077 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये जलप्रदुषण टाळण्यासाठी गॅबीयन वॉलची रचना करण्यात आलेली असून त्याच क्षेत्रात भाविकांनी श्रीमुर्ती विसर्जन करून जलाशयातील जैवविविधतेचे संरंक्षण करावे या महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला.
सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. परिमंडळ उपआयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच 750 हून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्डस् व अग्निशमन दल विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते. श्रीमूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
22 मुख्य विसर्जन स्थळे व 134 कृत्रिम तलाव अशा 156 विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे.
Published on : 02-09-2022 11:55:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update