*आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात विशेष कार्यशाळा संपन्न*
संयुक्त राष्ट्र संघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस “निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस” म्हणून जगभरात साजरा केला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या शहर कृती आराखडाची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभावीपणे केली जात असून शुध्द हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके विहीत मर्यादेत आणण्याकरिता नवी मुंबई शहर शुध्द हवा कृती आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम, प्रकल्प, सुविधा कामे करण्यात आली असून त्याची विस्तृत माहिती याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी दिली. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील नंबर 1 चे पर्यावरणशील शहर हा नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कृतिशील कार्यक्रम आखण्यात आला असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे श्री. संजय देसाई यांनी सांगितले.
वाहतुक कोंडीमुळे निर्माण होणा-या वायू प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी उड्डाणपुल निर्मिती, इलेक्ट्रीक बसेसचा वाढता वापर, जनसायकल सहभाग प्रणालीतून इंधन विरहीत सायकल वाहनाला प्राधान्य, 21 कि.मी. सायकल ट्रॅकची निर्मिती, ओला – सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे कचरा निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर भर, दैनंदिन 750 मेट्रीक टन घनकचरा संकलीत करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, बांधकाम व पाडकाम कच-यावर (सी ॲण्ड डी वेस्ट) शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया, महानगर गॅस लि. मार्फत पी.एन.जी. ची जोडणी जास्तीत जास्त घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरविणे, मियावाकी स्वरुपाची व्यापक शहरी जंगल निर्मिती करून प्रतिमानसी 1 झाड असे नियोजन अशा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणा-या विविध बाबींची माहिती यावेळी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी दिली.
नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता मापनासाठी व त्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती देत मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. जयंत कदम यांनी याकामी नवी मुंबई महानगरपालिकेचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.
वास्तुविशारद तथा वाहतुक नियोजनकार श्रीम. प्रांजली देशपांडे यांनी विविध शहरातील वाहतुकीमुळे होणा-या वायु प्रदुषणाची माहिती देत शाश्वत वाहतुक साधनांचा वापर करून हवेची गुणवत्ता व पर्यावरणाचा दर्जा सुधारण्याबाबत उपयोगी विवेचन केले. वायु प्रदुषणामुळे पुढच्या पिढीच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी आपल्या पिढीची अत्यंत महत्वाची जबाबदारी असून त्यादृष्टीने चालणे, सायकलींग व खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका दैनंदिन आचरणात आणण्याची गरज त्यांनी विषद केली. यादृष्टीने राष्ट्रीय कृती आराखड्यातील उद्देशानुसार रस्ते हे वाहनांसाठी नाहीत तर माणसांसाठी आहेत हे वाक्य कोरून ठेवले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक माणसाने आपले योगदान द्यायला हवे व पुढच्या पिढीचे आरोग्यदायी भविष्य घडवायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ हवा कृती आराखड्याचे सल्लागार श्री. श्रीकांत सोळुंके यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी करीत असलेल्या कृतिशील कामांची माहिती दिले. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, उप आयुक्त श्रीम. मंगला माळवे व श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, प्रादेशिक वाहन विभागाच्या वाहन निरीक्षक श्रीम. रश्मी पगार, उप अभियंता श्री. दिपक नगराळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 07-09-2022 15:34:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update