माहिती अधिकार दिनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र शासन आदेशानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याबाबतचे जनजागृती करणारे फलक महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांवर प्रसिध्द करण्यात आले. तसेच विविध व्हॉट्सॲप समुहातूनही याला व्यापक प्रसिध्दी देण्यात आली.
त्याचप्रमाणे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री नजरेसमोर ठेवून नागरिक हक्क जपत सुशासनाकडे ही भूमिका नजरेसमोर ठेवत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषत्वाने शासन निर्देशानुसार शाळा व महाविद्यालय येथील विद्यार्थी, युवकांमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी या अनुषंगाने विविध स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाले.
या स्पर्धांमध्ये महानगरपालिका व खाजगी शाळा, महाविद्यालये यांचा सहभाग होता. निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा माहिती अधिकार विषयानुरूप विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 केंद्रांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या 5 केंद्रांमध्ये बेलापूर, तुर्भे, इंदिरानगर केंद्रांतील 46 शाळांमधून 1151 विद्यार्थी, वाशी, शिरवणे केंद्रांतील 10 शाळांमध्ये 75 विद्यार्थी, कोपरखैरणे, घणसोली केंद्रांतील 14 शाळांमध्ये 72 विद्यार्थी, कोपऱखैरणे, कातकरीपाडा केंद्रांतील 16 शाळांमध्ये 134 विद्यार्थी आणि ऐरोली, दिघा केंद्रांतील 10 शाळांमध्ये 72 विद्यार्थी सहभागी झाले होते. अशाप्रकारे एकूण 96 शाळांतील 1503 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होत माहितीचा अधिकार कायद्याविषयी आपले विचार व संकल्पना मांडल्या.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीकरीता माहिती अधिकार दिनानिमित्त समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता कटिबध्द राहण्याचे निश्चित करण्यात आले.
Published on : 28-09-2022 14:54:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update