राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या कालावधीत लोकसेवा पुरविण्याच्या कामकाजाला गती
.jpeg)
नागरिकांना समयोजित व कालबध्द सेवा पुरविण्यासाठी कटिबध्दता राखत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची अंमलबजावणी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरु आहे. यामधील प्रलंबित अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणा-या 51 लोकसेवांमधील प्रलंबित प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभागांना दिलेले होते. त्यानुसार लोकसेवा पुरविणारे संबंधित विभाग व विभाग कार्यालये यांना कालबध्द कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.
शासन निर्देशानुसार दि.10 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रलंबित असणा-या लोकसेवा विषयक अर्जांबाबत तत्पर कार्यवाही करून 2 ऑक्टोबर पर्यंत अर्ज प्रलंबित राहणार नाहीत अशाप्रकारची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी तत्पर कार्यवाही करीत प्रलंबित 3463 अर्जांपैकी 3142 अर्जांवर कार्यवाही केली आहे व उर्वरित 321 अर्जांवर 2 ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करण्याची प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये लोकसेवा अंतर्गत प्राप्त अर्ज, शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून प्राप्त अर्ज तसेच पीजी पोर्टलवरून प्राप्त अर्ज अशा सर्व अर्जांचा निपटारा करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमार्फत नागरिकांना विहित कालावधीत लोकसेवा पुरविण्याची कार्यवाही करण्यात येत असते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्य लोकसेवा आयोगाचे कोकण विभाग आयुक्त डॉ. किरण जाधव यांनीही समाधान व्यक्त केले होते. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या कालावधीत या विषयीच्या कामकाजाला अधिक गती मिळालेली आहे.
Published on : 28-09-2022 17:21:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update