तिरंगी मानवी एकता साखळी करित नमुंमपा अधिकारी, कर्मचा-यांनी दिला एकतेचा संदेश
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनमोल योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे अर्थात राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी मानवी एकता साखळी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
मा. पंतप्रधान महोदय यांनी जाहीर केलेल्या पंचप्राण संकल्पनेत एकता ही एक महत्वाची संकल्पना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील एकता व अखंडतेसाठी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या देशभक्तीचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासन निर्देशानुसार एकतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने एकता दिनानिमित्त महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी एकतेचा संदेश प्रसारणासाठी अभिनव पध्दतीने तिरंगी मानवी एकता साखळीचे आयोजन करून राष्ट्राची एकता व अखंडता समर्थ राखण्यासाठी एकतेचे आवाहन केले. वास्तुरचनेचा देशातील एक उत्तम नमुना असणा-या महानगरपालिकेच्या आयकॉनिक वास्तूसमोर सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी या मानवी एकता साखळीत सहभागी होत हातात सलग तिरंगा पकडून राष्ट्रभक्तीचे एकात्म दर्शन घडविले. पावसाळी कालावधीत लावला न जाणारा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदीत 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील प्रतिकात्मक राष्ट्रध्वजही आज एकता दिनाचे औचित्य साधून आजपासून फडकविण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान करतानाच त्यांच्या एकात्म व अखंड भारताच्या विचारांची व मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश प्रसारित करीत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नवी मुंबईकर नागरिकांनीही एकता दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होत एकात्मतेचे दर्शन घडविले.
Published on : 31-10-2022 11:56:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update