*नमुंमपा मुख्यालयातील विशेष रक्तदान शिबिरात अधिकारी, कर्मचारी यांचे स्वेच्छेने रक्तदान*
कोणत्याही व्यक्तीच्या अडचणीच्या प्रसंगात त्याला भासणारी रक्ताची गरज पुरविण्यासाठी रक्तदानाइतके श्रेष्ठ दान नाही हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या 83 अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत इतरांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला. यामध्ये 75 पुरुष व 8 महिलांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयात विविध कामांसाठी भेट देणा-या 4 नागरिकांनीही यामध्ये स्वइच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले.
नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी सार्वजनिक रुग्णालयात स्वत:ची रक्तपेढी असून त्यामधून इच्छुक रक्तदात्यांना आवश्यकतेनुसार रक्ताचा पुरवठा करण्यात येत असतो. या रक्तपेढीमधील रक्तसाठ्यात वाढ व्हावी व नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये असलेली रक्तदानाव्दारे सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा रक्तपेढीच्या वतीने सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमधील आरोग्य सुविधांमध्ये वाढ झालेली आहे. या अनुषंगाने विविध प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी अथवा शस्त्रक्रियांप्रसंगी रक्ताची गरज वाढली असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वाशी सार्वजनिक रूग्णालयातील माँसाहेब मिनाताई ठाकरे रक्तपेढीमार्फत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील इच्छुक रक्तदात्यांसाठी करण्यात आले होते.
रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्व अनन्यसाधारण असून त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. असे सर्वश्रेष्ठ रक्तदान करणा-या या रक्तदात्यांना नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेढी यांचे प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, नमुंमपा वाशी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रिती संघानी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
*नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेढीच्या वतीने विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन ठिकठिकाणी रक्तदानाची शिबिरे आयोजित केली जात आहेत. या माध्यमातून रक्ताची जाणवणारी कमतरता दूर करून रक्तसाठा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेत समाजासमोर चांगला आदर्श ठेवला असून यापुढील काळात जागेच्या उपलब्धतेनुसार महापालिका विभाग कार्यालयांमध्येही अशा प्रकारे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी ज्या व्यक्ती / संस्था यांना आपल्या सोसायटी, संस्थेमध्ये अशाप्रकारे रक्तदान शिबिरांचे आयोजन करू इच्छितात त्यांनी 022-27888750 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.*
Published on : 09-12-2022 13:20:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update