जागतिक कोव्हीड स्थितीच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची तातडीने आढावा बैठक

चीनसह काही देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत महानगरपालिकेच्या वतीने केले जाणारे दैनंदिन कोव्हीड टेस्टींग आणि लसीकरण याविषयीचा बारकाईने आढावा घेतला.
चीनमध्ये ओ मायक्रॉनच्या ‘बीएफ 7’ या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात व ओऱिसा राज्यातही 4 रुग्ण आढळून आलेले आहेत. मागील कोव्हीड प्रभावीत कालखंडाचा अनुभव लक्षात घेता यापुढील काळात अधिक सतर्कता राखण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ‘कोव्हीडचा धोका अजूनही टळलेला नाही’ असा संदेश जनमानसात प्रसारित करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सध्या दैनंदिन 500 हून अधिक आरटी-पीसीआर टेस्टींग व 600 हून अधिक ॲन्टीजन टेस्टीग केल्या जात असून या टेस्टींगमध्येही वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणा-या एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स याठिकाणीही कोव्हीड टेस्टींग सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
यासोबतच कोव्हीड लसीकरणाकडेही विशेष लक्ष देत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी यांनी दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लवकरच कोव्हीड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यानुसार तत्पर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
यावेळी गोवर रुबेला लसीकरणाचीही स्थिती जाणून घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी गोवरचा उद्रेक झालेला आहे म्हणजे 2 पेक्षा अधिक रुग्ण सापडलेले आहेत अशा 6 आऊटब्रेक क्षेत्रात सर्वेक्षण आणि लसीकऱणावर भर देण्याचे निर्देशित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.
सद्यस्थितीत कोव्हीडचे अत्यल्प रुग्ण आढळून येत असले तरी कोव्हीडची जागतिक स्थिती पाहता आपण सतर्क राहण्याची गरज असून नागरिकांनी कोव्हीडचा धोका अद्याप पूर्ण टळलेला नाही हे लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-12-2022 13:27:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update