शहर स्वच्छता कामामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कामांना वेग देण्याच्या सूचना करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या आठही नोडल अधिका-यांनी आपापल्या विभागीय क्षेत्रात नियमित पाहणी दौरे करून स्वच्छता कामांकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश दिले. स्वच्छता कार्याशी संबंधित प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने जबाबदारी ओळखून आपले काम चोख करावे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
आयुक्त स्वत: करणार पाहणी दौरे
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मागील वर्षीचा देशातील तृतीय क्रमांक उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली असून यावर्षी देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकित होण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ च्या टूल किटनुसार संबंधित बाबींचा आयुक्तांनी विभागनिहाय बारकाईने आढावा घेत स्वत:ही पाहणी दौरे करणार असल्याचे संकेत दिले.
या बैठकीस आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच इतर नोडल अधिकारी व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कचरा वर्गीकरण, शहर स्वच्छता व शौचालय स्वच्छतेकडे नियमित व काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत दररोज निर्माण होणा-या कच-याचे घरापासूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण होणे गरजेचे असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचा-यांप्रमाणेच मुख्यालय स्तरावरूनही प्रयत्न करण्यात यावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले. सिडको विकसित नागरी भागाप्रमाणेच झोपडपट्टया व ग्रामीण भागातील कचरा वर्गीकरणाकडेही बारकाईने लक्ष देण्याचे व त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करण्याच्या व त्याची प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच दैनंदिन शहर स्वच्छतेकडे तसेच सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
स्वच्छता कामगार सन्मानार्थ जनपुढाकारातून यशस्वी 1 दिवस सुट्टी उपक्रम सर्व विभागांत राबविण्याच्या सूचना
वाशी आणि बेलापूर विभागात 1 दिवस स्वच्छता कामगारांना सुट्टी देऊन त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून त्यांच्या जागी लोकांनी पुढाकार घेऊन सफाई करण्याचे उपक्रम अत्यंत लक्षवेधी असल्याचे नमूद करीत ते यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले. लोकसहभागावर भर देत स्वच्छता उपक्रम राबविल्याने नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण होऊन त्याचा उपयोग शहराच्या स्वच्छता कार्यात सकारात्मक रितीने होत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारचे उपक्रम इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात राबवावेत व त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिक व युवक विद्यार्थी सहभागी व्हावेत यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
स्वच्छ मंथन स्पर्धा ही विभागाविभागांमध्ये स्वच्छता कार्यात आघाडीवर राहण्याची निकोप स्पर्धा निर्माण कऱणारी असून त्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपण आघाडीवर राहू याकरिता सर्वोत्तम कार्य करण्याची जिद्द मनाशी बाळगून जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत व त्यामध्ये सर्वांगीण लोकसहभागावर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. या अंतर्गत प्रत्येक आठवड्यात व्यापक लोकसहभाग असेल अशा प्रकारचे मोठे उपक्रम राबवावेत असेही आयुक्तांनी सूचित केले.
प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांना गती देत शून्य प्लास्टिक ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल
प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना तसेच दंडात्मक कारवायांना सर्वच विभागांमध्ये गती आल्याचे चित्र दिसत असले तरी आपल्याला शुन्य प्लास्टिक हे लक्ष्य साध्य करायचे आहे हे लक्षात घेऊन या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी प्रबोधन करण्याप्रमाणेच नागरिकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
महामार्ग, एमआयडीसी क्षेत्राप्रमाणेच बॅकलेन स्वच्छता व सुशोभिकरणावर भर
ठाणे बेलापूर मार्ग, सायन पनवेल मार्ग तसेच एमआयडीसी क्षेत्र येथील स्वच्छतेकडे व रस्त्यांशेजारील सुशोभिकरणाकडे अधिक काटेकोर लक्ष देऊन केलेल्या नियोजनाची तत्पर अंमलबजावणी करण्याच्या कामाला वेग द्यावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. सुशोभिकरणामध्ये बॅकलेन हा एक महत्वाचा घटक यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यांतर्गत समाविष्ट झालेला असून यादृष्टीने काही भागात चांगले काम झाले आहे ते शहराच्या सर्वच विभागांमध्ये होईल व व्यापक स्वरुपात दिसून येईल अशाप्रकारे कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
त्यासोबतच शहर सुशोभिकरणाच्या कामांमध्ये लक्षवेधी चित्रांसोबत स्वच्छतेविषयी व नागरिक म्हणून जबाबदारीविषयी प्रबोधन होईल अशा प्रकारचे आकर्षक संदेश लिहिले जावेत अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
नवी मुंबई शहराने स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन उंचावत ठेवले असल्यामुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावरून नवी मुंबईकडून अधिक चांगल्या कामाच्या अपेक्षा ठेवल्या जातात याची जाणीव ठेवून महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामाची जबाबदारी ओळखून पूर्ण क्षमतेने सर्वोत्तम कामगिरी करावी असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या कामी निष्काळजीपणा केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना दिले.
Published on : 18-01-2023 12:13:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update