मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निबंध स्पर्धेत तब्बल 219 नमुंमपा कर्मचा-यांचा सहभाग
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वच उपक्रमांना भरघोस प्रतिसाद लाभताना दिसत आहे. पंधरवड्यानिमित्त महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या निबंध व स्वकाव्यवाचन या दोन्ही स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
यापैकी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित निबंध स्पर्धेत ‘पर्यावरण संवर्धन – माझी संकल्पना’ अथवा जागर अभिजात मराठीचा’ या 2 विषयांवर तब्बल 219 निबंध प्राप्त झाले आहेत. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये एखाद्या विषयावर सर्वांगीण विचार कऱण्याची सवय रुजावी या दृष्टीने या 2 पैकी एका विषयावर 2000 शब्द मर्यादेत निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
अशाच प्रकारे दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये स्वकाव्यवाचन स्पर्धेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजन करण्यात आले असून त्यामध्येही सहभागासाठी मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. दि. 24 जानेवारीपर्यंत नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील इच्छुक कवींनी आपली नावे विधी अधिकारी श्री. अभय जाधव, अधिक्षक श्री. अरविंद उरसळ अथवा श्री. रवी जाधव यांच्याकडे जमा करावयाची आहेत. या स्वकाव्यवाचन स्पर्धेच्या माध्यमातून नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्यातील साहित्य गुणांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा स्वकाव्यवाचन स्पर्धेनंतर दु.2 वाजता स्पर्धास्थळी संपन्न होणार आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये मंगळवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुप्रसिध्द साहित्यिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘जीए : स्मरणखुणा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रा. वृषाली मगदूम, डॉ. मृण्मयी भजक आणि श्रीम. मीनाक्षी पाटील या जी.ए.कुलकर्णी यांच्या आठवणींचा तसेच अभिजात साहित्याचा मागोवा घेत काही साहित्यकृतींचे अभिवाचन करणार आहेत.
Published on : 23-01-2023 14:25:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update