भव्यतम रिक्षा रॅलीव्दारे ऐरोली विभागात स्वच्छतेचा जोरदार प्रचार


स्वच्छ मंथन स्पर्धेमुळे विभाग कार्यालयांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्याची चुरस निर्माण झाली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जाता आहे.
असाच एक अभिनव उपक्रम ऐरोली विभागामध्ये परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी राबविण्यात आला. ‘भारत माता की जय’ च्या घोषासोबतच ‘निश्चय केला - नंबर पहिला’ या स्वच्छ सर्वेक्षणातील घोषणांनीही ऐरोली परिसर दणाणून निघाला.
याप्रसंगी आयोजित रिक्षा रॅलीसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये शंभराहून अधिक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांसह सहभागी होत संपूर्ण ऐरोली परिसरात स्वच्छतेचा जागर केला. कच-याचे घरातच ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण करणे. मोठ्या सोसायट्या व संस्थांनी आपल्याकडील दररोज निर्माण होणा-या ओल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प सुरु कऱणे, प्लास्टिक पिशव्या व एकल प्लास्टिकचा वापर टाळून कापडी वा कागदी पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे अशा स्वच्छता आणि आरोग्यविषयक विविध बाबींचा घोषणा देत, फलक, बॅनर्स उंचावित मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार कऱण्यात आला. यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांसह ऐरोली विभागातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऐरोली विभाग कार्यालयामार्फत स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश लिहिलेले आकर्षक टि शर्ट रॅलीमध्ये उठून दिसत होते. हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम यशस्वी करण्यासाठी ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री. महेंद्र सप्रे यांच्यासह उप अभियंता श्री. बंधु शिरोसे, श्री. संतोष शिकतोडे, श्री. शंकर जाधव, स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे, अधिक्षक श्री. महेश नाईक, श्री. पाटेकर, श्री. अनिल पाटील तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ऐरोली विभाग कार्यालयामार्फत तब्बल 100 हून अधिक रिक्षांच्या सहभागाने यशस्वी झालेल्या या रिक्षा रॅलीव्दारे विविध भागात स्वच्छतेचा जोरदार प्रचार करण्यात आल्याने प्रजासत्ताक दिनी ऐरोली विभागात देशभक्तीप्रमणेच स्वच्छतेचीही लाट उसळलेली दिसली.
Published on : 30-01-2023 12:40:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update