ऐरोली विभागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या 20 व्यावसायिकांकडून 1 लाख रुपयांची दंड़ वसूली
स्वच्छ सर्वेक्षणातील एक महत्वाचा भाग म्हणजे निसर्गाला हानीकारक असणा-या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे हा असून यादृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे.
पर्यावरप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा धोका ओळखून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा तसेच पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा याविषयी महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने धडक कारवाया करण्यात येत आहेत.
अशाच प्रकारची प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांनी आपल्या सहका-यांसह सलग 2 दिवस केली असून पहिल्या दिवशी रु.40 हजार व दुस-या दिवशी रु.60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्याकडील प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
यामध्ये सेक्टर 2 ऐरोली येथील हॉटेल वृषाली, फिरोज चायनीज सेंटर, साई स्नॅक्स, लोकल कट्टा, महालक्ष्मी भोजनालय, पतंग हॉटेल, बेहप्पा मोमोज, सावित्रीदेवी निषाद या व्यावसायिकांकडून सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने प्रत्येकी रु.5 हजार प्रमाणे एकूण रु.40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे हिच धडक कारवाईची मोहीम दुस-या दिवशीही प्रभावीपणे राबवित सेक्टर 20, ऐऱोली गांव, यादवनगर तसेच प्र.क्र. 11, 12, 14, 06 या परिसरात धडक कारवाई करत 45 दुकानांची झडती घेण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळलेल्या स्टोअर्स, किराणा भांडार, चिकन शॉप, डेअरी, जनरल स्टोअर्स, फळ विक्रेता अशा 12 व्यावसायिकांकडून प्रत्येकी रु.5 हजार प्रमाणे एकूण रक्कम रु.60 हजार इतका दंड वसूल कऱण्यात आलेला आहे व प्लास्टिकचा साठाही जप्त करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे 2 दिवसात ऐरोली विभाग कार्यक्षेत्रात 1 लाख रक्कमेचा दड सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकरी श्री. सुभाष म्हसे, कनिष्ठ अभियंता श्री. मयुरेश पवार, अधिक्षक श्री. महेश नाईक आणि त्यांच्या सहका-यांनी जमा केला असून संबंधित व्यावसायिकांना समज दिलेली आहे. प्लास्टिक ही पर्यावरणासह मानवी जीवनाला सर्वाधिक धोका पोहचविणारी गोष्ट असून सुजाण व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्या देऊच नयेत तसेच पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 31-01-2023 12:09:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update