‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानांतर्गत नवी मुंबईतील 2 लाखांहून अधिक बालकांची होणार आरोग्य तपासणी

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारीपासून ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियान कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ० ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या सर्वांगीण तपासण्या करण्यात येणार आहेत. हे अभियान नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षेतेखाली सिटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून अभियान यशस्वी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे.
या अभियानांतर्गत ० ते १८ वर्षवयोगटातील सर्व मुले व मुलींची आरोग्य तपासणी करणे, त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 9 फेब्रुवारीपासून पुढील आठ आठवडे म्हणजेच 45 ते 48 दिवस हे अभियान राबविले जाणार असून यामध्ये तपासणीअंती आवश्यकता भासल्यास त्या मुलांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
नमुंमपा कार्यक्षेत्रात हे अभियान यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले असून शासकीय, निमशासकीय, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, दिव्यांगशाळा, अंगणवाडी, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालय, वसतिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाडी, खाजगी शाळा, खाजगी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तपासणी करण्यात येणार आहे.
अभियानाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दैनंदिन तपासणी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आयएमए व आयएपी यांची सभा घेण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचीही सभा घेण्यात आली आहे.
या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रसिध्दी मोहीम राबविण्यात आली असून बॅनर व होर्डींग प्रमाणेच विभागाविभागात ठिकठिकाणी माइकिंग करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय, अनुदानीत, खाजगी, दिव्यांग विशेष अशा शाळा. बालगृहे, अनाथालये, आश्रमशाळा अशा विविध 283 शाळांच्या ठिकाणी 1,73,913 बालके असून एकूण 352 अंगणवाडी / बालवाडींच्या ठिकाणी 37901 बालके आहेत. त्यास अनुसरून 45 पथकांव्दारे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
अभियानांतर्गत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरूळ, ऐरोली येथे दर मंगळवार व शुक्रवारी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाव्दारे देशाचे भविष्य असणा-या बालकांच्या आरोग्याची काळजी घेत एकप्रकारे आपल्या देशाचा भविष्यकाळ सुदृढ असण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
Published on : 08-02-2023 11:56:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update