जागतिक महिला दिनाचा आनंदोत्सव नवी मुंबईकर महिलांनी उत्साहात केला साजरा
महिला आज सर्वच क्षेत्रात धडाडीने आघाडीवर असून अनेक क्षेत्रात तिने स्वत:चे अस्तित्व समर्थपणे सिध्द केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या मधल्या कालखंडानंतर होत असलेला आजचा महिला दिन हा आपल्या सावित्रीच्या लेकींचा हक्काचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस असल्याचे मत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, माजी नगरसेविका श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. रंजना सोनावणे, श्रीम. शशिकला पाटील, श्रीम. हेमांगी सोनावणे, माजी उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व श्रीम. संध्या अंबादे, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे, सहाय्यक आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे व श्री. दत्तात्रय घनवट, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी विभागाच्या वतीने महिला तसेच इतर समाज घटकांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी योजनांमध्ये तृतीय पंथीय घटक, शरीर विक्री करणा-या महिला, आदिवासी घटक याकरिता राबविण्यात येणा-या नवीन योजनांची भर घालण्यात आली असल्याचे सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जात असल्याचेही ते म्हणाले.
यानिमित्त शंभरहून अधिक महिला बचत गटांनी, महिला संस्थांनी निर्माण केलेल्या विविध उपयोगी वस्तू, साहित्य यांचे प्रदर्शन विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये मांडणी करून ठेवण्यात आलेले होते. त्यालाही महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
अधिवेशनामुळे कार्यक्रमास उपस्थित न राहू शकलेले लोकप्रतिनिधी खासदार श्री. राजन विचारे, आमदार श्री. गणेश नाईक, आमदार श्रीम. मंदा म्हात्रे यांच्या वतीनेही उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित नाटक लोक-शास्त्र सावित्री सादर करण्यात आले. लेखक, दिग्दर्शक मंजुल भारव्दाज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विचारप्रवर्तक नाटकाला उपस्थित महिलांनी प्रचंड दाद दिली. नाटक संपल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात अनेक महिलांनी सखोल विचार करायला भाग पाडणारा नाट्यप्रयोग अशा शब्दात रंगमंचावर येऊन अभिप्राय व्यक्त केले. दिग्दर्शक मंजुल भारव्दाज यांच्यासह कलावंत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर यांचाही याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व त्यांना माणूस म्हणून जगण्याची ओळख मिळवून देणे गरजेचे असल्याचा विचार रुजविणारे हे नाटक तितक्याच उत्तम सादरीकरणामुळे प्रभावी ठरले.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, परिचारिका श्वेता वराडे, शिक्षिका समिक्षा लोट व सविता घुले, महिला पोलीस कर्मचारी शर्मिला नाईक, महिला सफाई कामगार शांता तांडेल, संगिता पगारे, वृषाली कांबळे, नंदा कुलये, शोभा उबाळे, चौरी पाटील, नंदा बच्छाव, सिताबाई जाधव तसेच महिला लिंकवर्कर सारिका डोहाळे, रंजिता घरत, विद्या आलदार, स्वाती जाधव, शोभा कोकरे, कल्पना मोरे, रेश्मा कोंडे, शीला मोरे अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष श्रीम. वृषाली मगदुम यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांसाठी काढण्यात आलेल्या पैठणीच्या लकी ड्राँ मध्ये प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे सारिका पवार, सुरेखा पवार, लता मोरे, सुरेखा चौधरी, ललीता घोरपडे, संजना जवळ, अंजनी दाभट, सुनिता बनसोडे या भाग्यवान विजेत्यांना येवले पैठणी प्रदान कऱण्यात आली.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने करण्यात आली. कोव्हीड कालावधीनंतर संपन्न होणारा हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नवी मुंबईकर महिलांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत उत्साहात साजरा केला.
Published on : 09-03-2023 09:30:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update