नमुंमपा प्रारुप विकास योजनेविषयीच्या सूचना व हरकतींच्या सुनावणीस प्रारंभ

नवी मुंबई महानगरपालिका विकास योजना 2018-2038 ही सुनियोजीत नवी मुंबई शहराला नवे सुविधाजनक स्वरुप बहाल करणार असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या प्रारुप विकास योजनेवर जागरूक लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून आलेल्या सूचना / हरकतींवर सुनावणी घेऊन शहर विकासाला नियोजनबध्द सुयोग्य गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप विकास योजनेवर प्राप्त सूचना व हरकतींची सुनावणी दि. 14 ते 29 मार्च या कालावाधीत जाहीर केलेल्या दिनांकास व वेळी आयोजित करण्यात आली असून त्याच्या प्रारंभाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थितांशी संवाद साधला.
प्रारुप विकास योजनेवर नागरिकांकडून 15890 सूचना / हरकती प्राप्त झाल्या असून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 28 (2) अन्वये सुनावणी देण्यासाठी संचालक, पुणे यांचे सूचनेनुसार नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर सुनावणी समितीची पहिली बैठक 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेली असून नागरिकांच्या हरकती / सूचना यावर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. सुनावणीचे वेळापत्रक यापूर्वीच सर्व माध्यमांतून जाहीर करण्यात आले असून प्रत्येक सूचना आणि हरकतदारांना नोटीसाही बजाविण्यात आलेल्या आहेत.
सुनावणीच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यापूर्वी सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी उपस्थित नागरिक तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सुनावणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. तसेच महापालिका आयुक्त तथा प्रशासक तसेच नियोजन समितीचे सदस्य श्री. राजेश नार्वेकर, महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक श्री. सुधाकर नांगणुरे, सेवानिवृत्त सहसंचालक श्री. प्रकाश भुकटे, वास्तुविशारद तथा पर्यावरण तज्ज्ञ श्रीम. निता पाकधने व अभियंता तथा व्हिजेटीआयचे विभागप्रमुख डॉ. केशव सांगळे या नियोजन समिती सदस्यांचे स्वागत केले.
सुनावणीची कार्यवाही सुयोग्यरितीने पार पाडावी याकरिता संपूर्ण नियोजन करण्यात आले असून प्राप्त सूचना / हरकतींच्या संख्येनुसार विभागनिहाय दिनांक आणि वेळ सूचना व हरकतदारांना कळविण्यात आलेली आहे. या विकास योजनेव्दारे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबईला नवा आयाम लाभणार आहे.
Published on : 14-03-2023 12:42:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update