शहर स्वच्छता कार्यात महिलांचे योगदान मोठे - नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरभर राबविण्यात येणा-या विविधांगी स्वच्छता उपक्रमात लोकसहभागावर व त्यातही महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला जात आहे. नुकतीच महानगरपालिकेने 5 हजारहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करून ‘स्वच्छोत्सव 2023’ अत्यंत उत्साहात साजरा केला.
घरातील दैनंदिन स्वच्छतेमध्ये महिला फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता मोहिमांमध्येही सर्व वयोगटातील महिला उत्साहाने सहभागी होताना दिसतात. अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नेरुळ येथील महिलांच्या पिंकेथॉन या संस्थेने हाती घेतला आणि 25 हून अधिक महिलांनी उत्साही सहभाग घेत सेक्टर 19 नेरुळ येथील आरटीओ ट्रॅक भोवतालचा परिसर साफ केला.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात प्लास्टिकच्या बॉटल्स, फेकून दिलेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून पिंकेथॉनच्या महिलांनी एक आदर्श उभा केला.
अशाच प्रकारे इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी येथील विद्यार्थ्यांनी टीएस चाणक्य सभोवतालच्या खाडी परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेऊन सागरी किनारा स्वच्छतेचे महत्व अधोरेखीत केले. या उपक्रमातही विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या मोहिमेत खारफुटी परिसरातील कचरा तसेच प्लास्टिक सहभागी विद्यार्थी व त्यांचे प्राध्यापक व स्वयंसेवक यांनी गोळा करून जनजागृती केली. 50 हून अधिक विद्यार्थिनी, विद्यार्थी व नागरिकांनी खाडीकिना-याचा परिसर कचरा विरहित करण्याचा संकल्प तडीस नेला.
या दोन्ही उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक श्री. विजय नाईक व श्री. नवनाथ ठोंमरे यांनी आपल्या सहका—यांसह महत्वाची भूमिका बजावली.
नागरिकांनीही व त्यातही महिलांनी शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच आपल्या घरातूनच कचरा 3 प्रकारे वर्गीकरण करून कचरा गाडीत द्यावा, मोठ्या प्रमाणात निर्माण होणा-या ओल्या कच-यावर प्रक्रिया करून त्याची खत निर्मिती करावी त्यासाठी सोसायटीच्या आवारात कंपोस्ट पीट्स तयार करावेत, घरगुती खत टोपलीचा वापर करावा आणि प्लास्टिक दैनंदिन वापरातून हद्दपार करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 10-04-2023 11:49:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update