नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 10.50 कोटी मालमत्ता कर वसूली

सन 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने मागील वर्षीपेक्षा 107.17 कोटी अधिक उत्पन्न मिळवित मालमत्ता कर विभागाने एका वर्षात मिळविलेल्या उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख श्रीम. सुजाता ढोले आणि त्यांच्या सहका-यांनी अत्यंत नियोजनबध्द काम करून उत्पन्नाचे उद्दिष्ट 575 कोटी पेक्षा अधिक 633.17 कोटी मालमत्ता कर वसूली करण्यापर्यंत झेप घेतली. 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या एका दिवसात 18.92 कोटी इतके उत्पन्न जमा करण्यात आले हा देखील कररुपी महसूल संकलनाचा विक्रम होता.
सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 801 कोटी इतके उत्पन्न मालमत्ता करातून जमा होईल असे उद्दिष्ट महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अंदाजपत्रक सादर करताना मालमत्ता कर विभागापुढे ठेवलेले असून त्यादृष्टीने मालमत्ता कर विभाग नियोजनबध्द पावले टाकत आहे. याचीच परिणीती म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात मार्च महिन्यातील कर वसूलीची गतीमानता कायम राखत रु.10 कोटी 50 लक्ष इतके उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झालेले आहे.
मालमत्ता कराची वसूली प्रभावीपणे करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात प्रमुख स्त्रोत असल्याने व करांपोटी जमा होणा-या महसूलामधूनच नागरी सेवा सुविधापूर्ती केली जात असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर विहित वेळेत भरून शहर विकासाला हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 10-04-2023 15:05:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update