डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे 12 पैलू
स्मारक कसे असावे याचा अत्यंत उत्तम नमुना म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जपणारे हे अव्दितीय स्मारक असल्याचे मत नामांकित अर्थतज्ज्ञ, विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. याठिकाणी नित्यनेमाने विचारांचा जागर केला जातो, त्यामुळे हे स्मारक स्थितीशील नाही तर गतीशील आहे अशी भावना त्यांनी अभिव्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आयोजित ‘जागर 2023’ या व्याख्यान शृंखलेंतर्गत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांच्या विश्वव्यापी व्यक्तीमत्वातील 12 विविध पैलूंवर भाष्य करीत माहितीपूर्ण विहंगम दर्शन घडविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य असे सांगत ‘विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बहुआयामी व्यक्तिमत्व’ या विषयाच्या अनुषंगाने डॉ. नरेंद्र जाधव यांनी ज्ञानमार्गी, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, अर्थप्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, राजकीय मुत्सद्दी, भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार, भाषावार प्रांत विश्लेषक, बौध्दधम्म प्रवर्तक अशा 12 विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण माहितीचा खजिना खुला केला. यामधील प्रत्येक पैलूवर विविध उदाहरणे देत, प्रसंग सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीची माहिती दिली.
बाबासाहेबांना गुरुस्थानी असलेले थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आजचे व्याख्यान होत असल्याचा आनंद व्यक्त करीत डॉ. नरेंद्र जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांना वैचारिक अभिवादन केले.
ज्ञान संपादनाची विलक्षण ओढ असणारे ‘ज्ञानमार्गी आंबेडकर’ मांडताना त्यांनी 18-18 तास एकाग्रतेने अभ्यास कऱणा-या बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचे विविध दाखले दिले.
जागतिक अर्थप्रणालीचा प्रचंड अभ्यास असणारे बाबासाहेब आपल्या देशासाठी कोणती आर्थिक प्रणाली योग्य ठरेल याचे स्पष्ट निदान करणारे ‘भविष्यवेधी अर्थतज्ज्ञ’ असल्याचेही विविध उदाहरणे देत डॉ. नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.
1924 साली स्थापित केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हे घोषवाक्य बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातील एक महत्वाचा भाग असल्याचे सांगत मानवी हक्काचे कठोर पुरस्कर्ते म्हणून ‘समाजसुधारक’ बाबासाहेबांच्या विविध आंदोलनांची, संघर्षशील घटनांची विस्तृत माहिती त्यांनी दिली.
अर्थतज्ज्ञ आणि अर्थप्रशासक या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सहजसोपी उदाहरणे देत समजावून सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेब केवळ अर्थविषयक पुस्तकी तज्ज्ञ नव्हते तर जमिनीशी जोडले गेलेले कुशल ‘अर्थप्रशासक’ होते हे विविध गोष्टी मांडत पटवून दिले.
शिक्षण हा माणसाच्या विकासाचा मूलाधार आहे हे जाणणा-या बाबासाहेबांनी मॉर्नींग कॉलेज सुरु केली, महाविद्यालयात स्टुडन्ट पार्लामेंट संकल्पना राबविली, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारखी शिक्षणसंस्था स्थापन करून सर्वसामान्यांपर्यंत उच्च शिक्षण नेले अशा विविध माध्यमांतून त्यांच्यातील ‘शिक्षणतज्ज्ञाचे’ दर्शन घडते असेही डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले.
प्रचंड लोकशाहीवादी असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीभेद निर्मूलन करणारे थोर ‘समाजशास्त्रज्ञ’ होते असेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी विविध प्रसंग कथन करीत स्पष्ट केले. सकल मानवाच्या कल्याणाचा विचार करणारे ‘मानववंशास्त्रज्ञ’ हा देखील बाबासाहेबांचा एक वेगळा पैलू असल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले.
‘कायदेतज्ज्ञ’ म्हणून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या न्याय व हक्कांसाठी विविध आंदोलनातून लढा दिलाच शिवाय कायदेमंत्री म्हणून अनेक लोकहितकारी व विशेषत्वाने स्त्री कल्याणकारी कायदे केले हे त्यांचे मोठेपण असल्याचे डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
मोठी माणसे देशाचा विचार करताना वैयक्तिक विचारसंघर्ष बाजूला ठेवून संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करतात हे अनेक उदाहरणांतून पटवून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजकीय मुत्सद्दी’ पणाचे विविध प्रसंग डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून, ‘’राज्य घटनेच्या सर्वसमावेशक निर्मितीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याव्यतिरिक्त दुसरे कोणी करू शकले नसते’’ - असे काढलेले उद्गार हे बाबासाहेबांच्या एकमेवाव्दितीय कार्यकर्तृत्वाचे द्योतक असल्याचे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांना ब्रिटीश चरित्रकारांनी ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ संबोधले व ते पुढे रुढ झाले अशीही माहिती दिली.
एक भाषा, एक राज्य ही संकल्पना राबविली तर देशाच्या उत्तर भागात मोठी मोठी राज्ये निर्माण होतील व दक्षिणेत छोटी छोटी राज्ये निर्माण होतील. यामुळे विषमता वाढून संघर्ष होईल हे द्रष्ट्या बाबासाहेबांनी आधीच ओळखले होते. त्यामुळे त्यांनी ‘एक राज्य, एक भाषा’ या संकल्पनेचा पुरस्कार केला असे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांच्या भविष्याचा वेध घेणा-या दूरदृष्टीविषयी भाष्य केले.
बौध्द धर्म स्विकारण्यापूर्वी त्यांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळेच सर्वसमावेशक अशा बौध्द धर्माचा आपल्या 7 लाखाहून अधिक अनुयायांसमवेत स्विकार करून बाबासाहेबांनी इतिहास घडविला असेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
अशा बहुआयामी प्रतिभावंत बाबासाहेबांच्या 12 विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य करताना बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला सामावून घेणा-या कवितांच्या ओळींचा शोध घेत असताना शेक्सपियरच्या ओळी सर्वाधिक योग्य वाटल्या असे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी, “पंचमहाभूते या व्यक्तीत अशाप्रकारे एकत्र आली होती की निसर्ग साक्षात खडबडून जागा झाला आणि म्हणाला, याला म्हणतात माणूस” - या कवितांच्या ओळी उधृत केल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची प्रचंड दाद दिली.
याप्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केल्यानंतर महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्न व्यक्तीमत्वाला विचारांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यासाठी महानगरपालिकेने ‘जागर’ हा व्याख्यानमालेचा उपक्रम आयोजित केल्याचे सांगत या व्याख्यानांना केवळ सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेर लावलेल्या एलईडी स्क्रीनसमोरही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिक जो प्रचंड प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान वाटते असे मनोगत व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर या व्याख्यानाप्रसंगी आवर्जुन उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, माजी महापौर श्री. सुधाकर सोनावणे, लेट्स रीड फाऊंडेशनचे श्री. प्रफुल्ल वानखेडे, सौ. वसुंधरा नरेंद्र जाधव तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या व्याख्यानाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जागर’ व्याख्यान शृखंलेत गुरुवार दि. 13 एप्रिल 2023 रोजी, सायं. 6 वाजता ‘भिमा तुझा जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे युवा पिढीचे 6 प्रतिनिधी बाबासाहेबांच्या ज्ञानसंपादनेच्या प्रेरक संदेशाचा उपयोग आपल्या सर्वांगीण विकासात कशाप्रकारे होतो याविषयी उपस्थितांशी सुसंवाद साधणार आहेत. तरी नागरिकांनी याही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानजागर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-04-2023 11:15:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update